अहिल्यानगर - व्हाट्स अॅपवर आलेली आरटीओ ई चालान एपीके फाईल ओपन केली आणि महिलेच्या बँक खात्यातून २ लाख २५ हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांच्या विरोधात ११ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अरणगाव रोडवरील हनुमाननगर येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे पती गॅस वितरणाचे काम करतात. ते सावेडी उपनगरात मिस्कीन मळा परिसरात गॅस टाक्या वितरणाचे काम करत असताना त्यांच्या मोबाईलच्या व्हाट्स अॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून वाहतूक पोलिसांच्या दंडाचे बनावट डिजिटल पत्रक (आरटीओ ई चालान एपीके फाईल ) आले होते. ते पत्रक खरे असल्याचे समजून त्यांच्याकडून चुकून डाऊनलोड झाले. त्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक झाला.
त्यांच्या मोबाईल वरून इतरांना फोन जावू लागले. मोबाईलमध्ये तांत्रिक अडचण आल्याने त्यांनी मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन लावला. समोरील अज्ञात व्यक्तीने ओळख पटवण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून आधारकार्डचे शेवटचे चार अंक मागवून घेतले. ही माहिती देताच अवघ्या काही वेळातच त्यांचा मोबाईल जोडलेल्या त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून सुरुवातीला एक लाख, त्यानंतर पुन्हा एक लाख आणि शेवटी पंचवीस हजार रुपये असे एकूण २ लाख २५ हजार रुपये चोरट्यांनी बेकायदेशीरपणे काढून घेतले.
पैसे कपात झाल्याचा संदेश मिळताच पीडित कुटुंबाने तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे कक्षाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीत या रकमेतील १ लाख ८४ हजार रुपये ४ वेगवेगळ्या संशयास्पद बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे समोर आले आहे. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा आधार कार्डची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment