नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यात एकाच रात्रीत २ गावांत चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोड्या केल्या आहेत. चास येथे घर फोडून ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर सारोळा कासार येथे किराणा दुकान फोडून ८० हजारांची रोकड आणि १ लाखाचा किराणा माल चोरून नेला आहे. या दोन्ही घटना गुरुवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आल्या. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चास येथील काशिनाथ रामभाऊ कार्ले (वय ४४, रा. चास, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह राहतात. १० जूनच्या रात्री १० ते ११ जूनच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष केले. फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ७० हजार रुपये किमतीच्या अर्धा तोळा वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे आणि पोलीस अंमलदार दाते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी कार्ले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे घडली. गावातील गजबजलेल्या छत्रपती चौकात असलेल्या एका किराणा दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश करत चोरट्यांनी दुकानातील विविध साहित्य, रोकड असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जाताना चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर ही पळवून नेला आहे.
याबाबत गणेश अनिल कडूस (रा.सारोळा कासार, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे गावातच केटरिंग आणि किराणा दुकान आहे. १० जून रोजी रात्री दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले होते. दरम्यान, रात्री १० वाजेपासून ते ११ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाला लक्ष केले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले १ लाख रुपयांचे किराणा सामान, ज्यामध्ये गावरान तूप, सुकामेवा, तेल डब्बे, चहापावडर, सिगारेट आणि मसाल्यांचा समावेश होता ते तसेच गल्ल्यातील ८० हजार रुपयांची रोकडही चोरून नेली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दुकानातील ५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआर मशीन चोरट्यांनी लंपास केली.
सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गणेश कडूस यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस हवालदार लाड करत आहेत. पोलीस आता परिसरातील इतर सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment