अहिल्यानगर - भिंगार जवळील बाराबाभळी शिवारात एका शेतात विजेचा तीव्र धक्का लागून दोन दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे दूध व्यावसायिक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दोघा जणांविरुद्ध निष्काळजीपणा केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत निलेश सतीश आहेरगवळी (वय ४०, रा. बाराबाभळी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे दूध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या म्हशी बाराबाभळी शिवारातील म्हशानखाणीच्या परिसरात नेहमीप्रमाणे चरत होत्या. याच परिसरात सार्वजनिक हायमॅक्स विजेचा खांब आहे.
या गावातील रहिवासी आरोपी अशोक कराळे आणि आबा कराळे या दोघांनी मिळून सार्वजनिक विजेच्या खांबावरून अनधिकृतपणे विजेचा आकडा टाकला होता. या टाकलेल्या वायरमधील वीज प्रवाह संपूर्ण परिसरात आणि जमिनीत उतरला होता. म्हशी चरत असताना या धोकादायक वीज प्रवाहाचा त्यांना जोरदार झटका बसला. या धक्क्याने एक जाफराबादी आणि एक म्हशान जातीची म्हैस जागीच दगावली.
याबाबत निलेश आहेरगवळी यांच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी अशोक कराळे आणि आबा कराळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अकोलकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment