वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रेच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिक व महिलांची लाखो रुपयांची फसवणूक


अहिल्यानगर - टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकाकडून धार्मिक सहलीचे आमिष दाखवून नगर शहरातील ज्येष्ठ नागरिकांची आणि महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला नेण्याच्या बहाण्याने एका ट्रॅव्हल्स चालकाने भाविकांकडून २ लाख ५६ हजार रुपये गोळा करून सहल ण नेता त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्मिता अनिल शितोळे (वय ६०, रा. पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव गुप्ता येथील दिनेश पोपट भोर याने त्याच्या बाबा अमरनाथ टूर अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायाची माहिती देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. त्याने फिर्यादी स्मिता शितोळे आणि त्यांच्या पतीला या धार्मिक सहलीत हेलिकॉप्टर व इतर चांगल्या सुविधा देण्याचे आमिष दाखवले. 

वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रेचे बुकिंग सुरू असल्याचे सांगून त्याने फिर्यादी शितोळे यांच्यासह त्यांच्या परिचयातील इतर लोकांकडून पैसे गोळा केले. या सर्वांनी विश्वासाने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने दिनेश भोर याला एकूण २ लाख ५६ हजार रुपये पाठवले.

पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी आरोपी दिनेश भोर याने तेथील हवामान खराब असल्याचे आणि हेलिकॉप्टर सेवा बंद असल्याचे कारण सांगून सहलीला नेण्यास टाळाटाळ सुरू केली. फिर्यादी व त्यांच्या समवेतच्या नागरिकांनी आपले पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पैसे परत केले नाहीत. 

या दरम्यान संशयित आरोपीकडे टूर अँड ट्रॅव्हल्सचा कोणताही अधिकृत परवाना (लायसन्स) नसून त्याने लोकांची शुद्ध फसवणूक केल्याचे समोर आले. या फसवणुकीबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आरोपी दिनेश भोर याच्या विरुद्ध १० जून रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments