उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंचा आणखी एक मोठा धक्का, आ. सचिन अहिर यांचा शिंदेसेनेत प्रवेश


 
मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठाचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार असलेल्या सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिला आहे. अहिर यांचा पक्षप्रवेश घडवून आणत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी फिल्डींग लावली आहे.

गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेसेनेचे लोकसभेतील ९ पैकी ६ खासदार गळाला लावले. पक्षांतरबंदी कायद्याला बगल देण्यासाठी शिंदेंनी आकड्यांचं गणित जमवलं. पण सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचून घेताना शिंदेंनी पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाट शोधून काढली. सध्याच्या घडीला विधान परिषदेत ठाकरेसेनेचे ६ आमदार आहेत. पैकी सचिन अहिर यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

वरळीत समीकरणं बदलणार

२०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच जून २०१९ मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. २०१४ मध्ये त्यांचा शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी पराभव केला. २०१९ मध्येही शिंदे यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वरळीतून लढण्याचं ठरवलं. त्यांच्यासाठी शिंदे यांनी माघार घेतली. त्याच्या बदल्यात शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

सचिन अहिरांचा पक्षांतराचा इतिहास

आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा यासाठी सचिन अहिर यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणलं गेलं. त्या बदल्यात त्यांना २०२२ मध्ये विधान परिषदेवर संधी दिली गेली. त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत असेल. तो संपण्याआधीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता सचिन अहिर यांना आपल्याकडे घेत शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. वरळीत शिंदेंना मजबूत चेहरा मिळाल्यानं २०२९ मध्ये या मतदारसंघातील लढत आदित्य यांच्यासाठी सोपी नसेल.

आदित्य ठाकरेंसाठी अवघड पेपर

२०२४ मध्ये आदित्य ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी कडवं आव्हान दिलं. २०१९ मध्ये ६७ हजारांनी निवडून आलेले आदित्य ठाकरेंचं मताधिक्क्य २०२४ मध्ये जेमतेम ९ हजारांवर आलं. सुनील शिंदे, सचिन अहिर असे विधानसभेचे माजी आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार दिमतीला असताना वरळीत आदित्य ठाकरेंची दमछाक झाली. यातील सचिन अहिर आता शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे २०२९ मध्ये आदित्य यांची कसोटी लागेल.

पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो?

वरिष्ठ वकील असिम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर बंदी कायद्यात दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद ५ नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष - उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती - उपसभापती आणि विधान सभेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन अहिर एकटे आमदार पक्ष सोडून गेले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेद ५ नुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे.

0/Post a Comment/Comments