अहिल्यानगर - नगर शहरातील पाईपलाईन रोड वर असलेल्या मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवलेल्या ठेवीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका ठेवीदार महिलेची ७ लाख २७ हजार २६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या चेअरमन आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्मिता दीपक दिकोंडा (वय ४१, रा. अमृतकलश अपार्टमेंट, द्वारका नगरी, बोरुडे मळा, सावेडी) यांनी १० जुलै रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी (वैजनाथ) या संस्थेच्या मोरया मंगल कार्यालय, पाईपलाईन रोड येथील शाखेतील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विश्वास संपादन केला होता. सोसायटीत ठेव ठेवल्यास त्यावर १२.१२ टक्के दराने व्याज परतावा देण्याचे आमिष त्यांनी फिर्यादीला दाखविले होते. या सर्वांवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी जून २०२३ मध्ये संस्थेत ६ लाख रुपये ठेव ठेवली.
मुदत संपल्यानंतरही फिर्यादीला त्यांची हक्काची रक्कम म्हणजे ६ लाख रुपये मुद्दल व त्यावरील १ लाख २७ हजार २६० रुपये व्याज अशी एकूण ७ लाख २७ हजार २६० रुपये एवढी रक्कम परत करण्यात आली नाही. जेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी "तुम्ही जर परत येथे दिसलास तर जिवंत सोडणार नाही," अशी जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्मिता दिकोंडा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बिहाणी (रा. परळी शहर, जि. बीड), त्यांची मुलगी पुजा बिहाणी, कर्मचारी वैभव नावडकर (रा. भिस्तबाग चौक), अर्जुन वाव्हळे (रा. पाईपलाईन रोड), कॅशियर रुक्मीणी राजेंद्र साळुंके (रा. तपोवन रोड), मिथुन गांधी (रा. बोरुडे मळा, अहिल्यानगर) व एक लेखनिक अशा ७ जणांविरोधात बीएनएस कलम ३१६(५), ३१६(२), ३५२, ३५१(२), ३(५) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे विश्वासघात, फसवणूक आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि. बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कल्पना चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment