नवी दिल्ली : धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पक्षाने केलेल्या जंतरमंतर येथील आंदोलनाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतर येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अभिजित दिपके काय म्हणाले?
"We have done it! काय म्हणायचे.. की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत." असं म्हणत अभिजीत दिपके यांनी मूठ आवळत जंतरमंतर येथील आंदोलकांसमोर विजयी भावना व्यक्त केली. "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. यावरुन हे सिद्ध होते की, जर तुम्ही घाबरला नाहीत आणि या सरकारसमोर झुकला नाहीत, तर तुम्ही भल्याभल्यांचा राजीनामा घेऊ शकता. लोकशाही आहे, घाबरू नका. बोलायची भीती वाटली तर कसली लोकशाही? आवाज उठवला तरच हे शिस्तीत राहतील" असं अभिजित दिपके यांनी सांगितलं.
जंतर मंतरवर अभिजीत दीपके म्हणाले, "मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या अजून दोन मागण्या आहेत. आम्ही असे जाणार नाही. एकदा झुरळ आत शिरले की ते बाहेर जाऊ शकत नाही. आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ते एका झुरळाशी पंगा घेत आहेत. आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला, तर तुम्ही कोण आहात? विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेतले पाहिजेत. भाऊ, ही लोकशाही आहे. महिनाभर लोक मला विचारत आहेत की तुम्ही काय करत आहात? अजून किती काळ स्वस्थ बसणार? ते राजीनामा देणार नाहीत. हे एक मनमानी सरकार आहे. पण आम्ही ते करून दाखवले."
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात गेल्या १२ वर्षांच्या काळात, आरोप झाले म्हणून फक्त एम जे अकबर या एकाच मंत्र्यांचा राजीनामा आतापर्यंत घेतला गेला होता. आता धर्मेंद्र प्रधान हे दुसरे उदाहरण ठरले आहे.

Post a Comment