अहिल्यानगर - ग्रामीण भागातील महिलांचे संघटन बळकट करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत ‘ग्रामसंवाद’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील महिला बचत गट चळवळीत अद्याप मोठ्या प्रमाणावर सहभागी न झालेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे ५,१२१ महिलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदविला.
या ग्रामसंवादादरम्यान श्री भंडारी यांनी महिलांशी थेट संवाद साधून महिला बचत गटांची स्थापना, महिलांचे संघटन, नियमित बचतीचे महत्त्व, आर्थिक स्वावलंबनासाठी उपलब्ध संधी आणि ग्रामीण विकासातील महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी एकत्र येऊन बचतीची सवय जोपासावी, शासनाच्या विविध योजना व अभियानांचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रशासक, समुदाय संसाधन व्यक्ती (CRP), समुदाय समन्वयक (CC) तसेच महिला बचत गटांच्या चळवळीत सहभागी असलेल्या व अद्याप सहभागी न झालेल्या महिलांशी या उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. महिला बचत गटांची उद्दिष्टे, त्यांचे फायदे, सामूहिक प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या आर्थिक संधी आणि ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. अधिकाधिक महिलांनी महिला बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले.
या वेळीप्रकल्प संचालक श्रीमती मंजुषा ठवकर यांनी महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण विकासामध्ये महिला बचत गटांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी संघटित होऊन सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून विकासाच्या नव्या संधी निर्माण कराव्यात आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून स्वतःच्या प्रगतीसोबतच कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गट चळवळीची उद्दिष्टे, गटांमध्ये सहभागी होण्याचे फायदे आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या उपजीविकेच्या संधी यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे सांगितले. संवादादरम्यान अनेक महिलांनी बचत गटांमध्ये सहभागी होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत गट स्थापन करण्याची अथवा विद्यमान गटांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
१०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ५,१२१ महिलांपर्यंत थेट पोहोचलेल्या या ‘ग्रामसंवाद’ उपक्रमामुळे ग्रामीण महिलांचे संघटन बळकट करण्यासाठी आणि महिला बचत गट चळवळीचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. महिलांचा सहभाग वाढविणे, त्यांना शासनाच्या विविध योजनांशी जोडणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना ग्रामीण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Post a Comment