ऐन निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत बुधवारी (दि.२९) पुन्हा एकदा सत्तांतर झालं. गुरुमाऊली मंडळाच्या रावसाहेब रोहोकले गटाच्या ताब्यातून सत्ता हिसकावून घेणाऱ्या बापूसाहेब तांबे गटाच्या ताब्यातील सत्ता रोहोकले गटाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कशी ? ताब्यात घेतली. हा प्रश्न जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना तसेच राजकारणाबद्दल विशेष रुची असलेल्या सर्वांनाच पडलेला आहे. आम्हालाही तो पडला होता. म्हणून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, शिक्षक बँकेच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून जे चालत आलंय. तेच पुन्हा घडलंय...त्यात काही नवीन नाही. तोच खंजीर, तेच डावपेच आणि तसेच वार ... फक्त वार करणारे हात आणि ते वार झेलणारी पाठ बदललीय बाकी काही नाही... थोडक्यात म्हणजे, इतिहासाची पुनरावृत्ती झालीय.
काय घडलंय शिक्षक बँकेच्या इतिहासात...
शिक्षक बँकेच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघितला तर सदिच्छा मंडळ म्हणजेच शिक्षक बँक आणि शिक्षक बँक म्हणजेच सदिच्छा मंडळ हे एक समीकरणच अनेक वर्ष बनलेलं होत. बँकेच्या निवडणुकीत एक वेळ निवडून येण सोपं होत पण सदिच्छा मंडळाची उमेदवारी मिळवणे एक दिव्य होत. ज्या दिवशी सदिच्छा मंडळाची उमेदवारी जाहीर झाली त्याचं दिवशी तो शिक्षक बँकेचा संचालक झाला अशी ती परिस्थिती होती. पण काळ बदलला आणि काळाच्या ओघात सर्व चित्रच पालटून गेले.
सदिच्छा मंडळात श्रेयवादाची आणि वर्चस्वाची लढाई सुरु झाली. कुरबुरी वाढल्या, पण वेळोवेळी उठलेले हे 'पेल्या'तील वादळ 'पेल्या'तच शांत होत होते. पण नंतर एक मोठी त्सुनामी आली आणि आज बरोबर १६ वर्षांपूर्वी २ ऑक्टोबर २००५ (महात्मा गांधी जयंती) या दिवशी सदिच्छा मंडळाला इतिहासातील सर्वात मोठ भगदाड पडलं. सदिच्छा फुटली आणि त्यातून गुरुकुल मंडळाचा उदय झाला. सदिच्छात अनेक वर्ष दुसऱ्या फळीत काम करणारे अनेक जण गुरुकुलचे पहिल्या फळीतील नेते झाले. त्यांनी जिल्हा पिंजून काढत तसेच सदिच्छा मंडळाचा पारंपारिक विरोधक असलेल्या ऐक्य मंडळा सोबत बँकेची २००६ ची निवडणूक लढवत बँकेवर सत्ताही मिळविली.
५ वर्षे बाहेर राहून पुन्हा सत्तेत आलेल्या सदिच्छाला सत्ता मानवली नाही
बँकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा सदिच्छा मंडळ सत्तेच्या बाहेर फेकले गेले. पण सत्तेच्या ५ वर्षात गुरुकुल आणि ऐक्य मंडळात झालेला बेबनाव आणि ५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्यामुळे सदिच्छा मंडळाने जोमाने केलेली संघटन बांधणी या जोरावर २०११ ची निवडणूक सदिच्छा मंडळाने पुन्हा एकदा जिंकली. ५ वर्ष सत्तेत असलेले गुरुकुल आणि ऐक्य मंडळ स्वतंत्र लढले आणि पराभूत होऊन सत्तेबाहेर फेकले गेले. ५ वर्षाच्या खंडानंतर मिळालेली सत्ता सदिच्छा मंडळाला काही मानवली नाही. पुन्हा त्यांच्यात धूस फूस सुरु झाली. त्यावेळी सदिच्छात नेत्यांची संख्याही वाढू लागली होती, त्यामुळे इतका बेबनाव वाढला की, संचालक मंडळालाही कोणत्या नेत्याचे ऐकावे असा प्रश्न पडू लागला. त्यात काही हुशार मंडळींनी दिलेल्या सल्ल्यामुळे तर एकवेळ अशी आली की, संचालक मंडळाने नेत्यांना कोलून लावले. त्यामुळे संचालक मंडळ विरुद्ध सदिच्छा मंडळ असा संघर्ष सुरु झाला. त्यामुळे सदिच्छा मंडळाचे धिंडवडे संपूर्ण जिल्ह्यातील गावागावातील वेशीवर टांगले गेले. सदिच्छा मंडळाची चांगलीच नाचक्की झाली.
सदिच्छात दुसऱ्यांदा फुट अन् गुरुमाऊलीचा उदय
त्यातच सन २०१६ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले, या निवडणुकीत सदिच्छा मंडळाच्या नावावर मत मागणे म्हणजे कपाळमोक्ष करून घेणे. हे मंडळातील काही चाणाक्ष मंडळींनी हेरले आणि मग सदिच्छातून फुटून नव्या मंडळाच्या उभारणीचे काम सुरु झाले. १० वर्षांनी पुन्हा सदिच्छा मंडळात उभी फुट पडून गुरुमाऊली मंडळाचा उदय झाला. या मंडळाची स्थापना करताना मंडळाला एक चेहरा देण्यात आला. तो ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहोकले यांचा. सदिच्छाची डागाळलेली प्रतिमा, विरोधी मंडळांमध्ये माजलेली दुही, याचा घेण्यात गुरुमाऊली मंडळ यशस्वी होवून सन २०१६ च्या निवडणुकीत सत्तेवरही आले. जाहीर प्रचारातून सांगितल्या प्रमाणे रावसाहेब रोहोकले चेअरमन झाले, आणि ते तब्बल साडेतीन वर्ष म्हणजे शिक्षकी सेवेतून निवृत्त होईपर्यंत चेअरमन पदावर होते. रोहोकले सेवानिवृत्त झाल्यावर आपणच मंडळाचे नेते, अशी स्वप्ने अनेकांना त्यावेळी पडू लागली होती. परंतु रोहोकले यांनी सेवानिवृत्तीनंतरही शिक्षक बँक व मंडळातील हस्तक्षेप कायम ठेवल्याने यातील एक नेत्यांचा मोठा गट दुखावला गेला.
गुरुमाऊलीत ही झाली सदिच्छाची पुनरावृत्ती
या दुखावलेल्या गटाने रोहोकले यांच्या विरुद्ध उघडपणे बंड करत बँक व मंडळ ताब्यात घेतले. बँकेतील २१ पैकी १४ संचालक या गटाकडे गेले तर ७ संचालक रोहोकले गटाकडे कायम राहिले. बँकेत सत्तेवर आलेल्या या गटाचे नेतृत्व करत होते बापु तांबे, या बंडात त्यांना बँकेचे माजी चेअरमन आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, कैलास चिंधे, दत्ता कुलट, सलीमखान पठाण, संतोष दुसुंगे अशा अनेकांची साथ मिळाली होती. गेली २ अडीच वर्षे सर्व सुरळीत चाललेले आहे असे वाटत होते, येणाऱ्या निवडणुकीत तांबे गटाचे पारडे जड असेल अशीही चर्चा शिक्षक वर्गात सुरु होती. मात्र या गटात एक अंतर्गत खदखद सुरु होती. ती इतके दिवस कोणाच्याही लक्षात आली नाही. पण थेट बुधवारी (दि.२९) बँकेच्या पदाधिकारी निवडीच्या वेळीच ही खदखद बाहेर पडून त्याचे रुपांतर सत्तांतर घडविण्यात झाले. कोणी केले हे सर्व राजकीय डावपेच हे बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याला समजले नव्हे. मात्र आता ते सगळ उघड झालं आहे. ज्यांनी बापु तांबे गटाला सत्तेत बसविले, त्यांनीच त्यांना सत्तेतून पाय उतारही केले. असे आम्ही म्हणत नाही तर असा दावा ते स्वत:च करत आहेत. ते आहेत आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे आणि कैलास चिंधे.
काय? म्हणाले, रावसाहेब सुंबे आणि कैलास चिंधे
शिक्षक बँकेतील या राजकीय सत्तांतर नाट्यावर बोलताना रावसाहेब सुंबे व कैलास चिंधे म्हणाले बापु तांबे यांनी रावसाहेब रोहोकलेंशी गद्दारी केली. त्यावेळी आम्हीही त्यांना साथ दिली. सुरुवातीला वाटले होते की, बापु तांबे संघटनेतील एक धडपडणारा कार्यकर्ता आहे. पण नंतर आमचा पुरता भ्रमनिरास झाला. रोहोकले आणि तांबे हे एकाच माळेचे मनी निघाले. बँकेच्या शताब्दी निमित्त सभासदांसाठी केलेल्या घड्याळ खरेदीला आमचा विरोध होता, मात्र बापु तांबे यांनी सर्वांचा विरोध झुगारून लावत घड्याळ खरेदी केली. त्यामुळे बँकेची प्रचंड बदनामी झाली. तेव्हा पासूनच बापु तांबे विषयी पूर्वी असलेले आमचे मत बदलले होते. त्या नंतरच्या कालावधीत तांबे यांचा सुरु झालेला एककल्ली कारभार आम्हा कोणालाही मानवला नाही, आपण शिक्षक सभासदांशी प्रतारणा करतोय असे सारखे वाटत होते. बापु तांबे आणि त्यांच्या कंपूला थांबविण्यासाठी त्यांनी रोहोकले यांना ज्या पद्धतीने दगा दिला त्याच पद्धतीने त्यांचाही कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरविले आणि ते करूनही दाखविले. तांबे गटातील ६ संचालक आम्ही फोडून त्यांना सत्तेतून पायउतार केले. हे केले केवळ सर्वसामान्य शिक्षकांच्या हितासाठी. या पुढील काळात शिक्षक संघ वाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार असून राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या हितासाठी कायम कार्यरत राहणार असल्याचे रावसाहेब सुंबे आणि कैलास चिंधे यांनी सांगितले.
शिक्षक बँकेच्या राजकारणात रावसाहेब रोहोकले गटाला सत्तेतून बाहेर काढणाऱ्या बापु तांबे गटाला त्याचं पद्धतीने अतिशय गोपनीयता राखून ऐनवेळी आपले पत्ते ओपन करत धोबीपछाड दिली गेली. या एवढ्या मोठ्या कटाची खबर कोणाला लागू दिली गेली नाही. त्यामुळे या मागे आणखी कोणाचं 'डोकं' आहे का ? याची शंका आम्हाला आली आहे. त्याचा शोध आम्ही घेऊच आणि तुम्हालाही नक्कीच सांगु. तूर्त तरी एवढे ... शेवटी जाता जाता एकच ... या घडामोडी पाहता आम्ही वर म्हंटल्या प्रमाणे तोच खंजीर, तेच डावपेच आणि तसेच वार ... फक्त वार करणारे हात आणि ते वार झेलणारी पाठ बदललीय बाकी काही नाही... थोडक्यात म्हणजे, इतिहासाची पुनरावृत्ती झालीय.
www.mazamaharashtra.in
आयुष्य भर तुम्हाला फक्त तेवढच करता आलं ......
ReplyDeleteत्यांच्यात जर एव्हढी क्षमता असती तर तेच आज वनवासी झाले नसते..
ReplyDeletePost a Comment