नगर तालुका (प्रतिनिधी) - रात्रीच्या वेळी मालट्रक ला फॉरच्युनर कार आडवी लावून चार अनोळखी इसमांनी ट्रकचालक आणि त्याच्या मित्राला मारहाण करत त्यांच्या जवळील २ लाख रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना नगर बीड रोडवर भातोडी (ता.नगर) शिवारातील पुलाजवळ शनिवारी (दि.२३) रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास घडली.
याबाबत सचिन गोपाल गर्जे (वय ३४, रा. आष्टी, जि.बीड) यांनी रविवारी (दि.२४) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गर्जे हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेवून बीड कडे जात होते. त्यांच्या समवेत त्यांचा मित्र शुभम धोंडीराम घुले होता. ते भातोडी शिवारात पुलाजवळ पोहचले असता त्यांच्या पाठीमागुन एक फॉरच्युनर कार मधुन चार अनोळखी इसम येवुन त्यांची गाडी ट्रक ला आडवी लावली. त्यानंतर फिर्यादी गर्जे व त्यांचा मित्र शुभम यास गाडीचे खाली ओढुन फिर्यादीला बेल्टने व लाथाबुक्कक्यांनी मारहाण करुन तसेच फिर्यादीचा मित्र शुभम यास लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी करुन फिर्यादी गर्जे याचे खिशातील दोन लाख रुपये बळजबरीने काढून घेवुन त्याचे फॉरच्युनर कार वाहनातुन निघुन गेले.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेचची पाहणी करून ते तपासासाठी ताब्यात घेतले आहे. एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयित फॉरच्युनर कार दिसून आली असून पोलिस त्या कारचा शोध घेत आहेत.
बातमी खरी आहे का ही
ReplyDeletePost a Comment