नगर तालुका (प्रतिनिधी) - वाहनांची अतिशय वर्दळ असलेल्या केडगाव ते सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार ते घोसपुरी या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड दुरावस्था झालेली आहे.या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले मात्र ठेकेदाराने ते अर्धवट सोडले असल्याने परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची येत्या ७ दिवसात दुरुस्ती न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
केडगाव घोसपुरी रस्त्यावर सोनेवाडी बायपास चौकापासून पुढे थेट घोसपुरी पर्यंत ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचे पार्ट आणि वाहनचालकांचे हाडे अक्षरश: खिळखिळे होत आहेत. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर सोनेवाडी, अकोळनेर भोरवाडी, जाधव वाडी, सारोळा कासार, घोसपुरी, अस्तगाव आदी गावांतील नागरिक प्रवास करत असतात.
या शिवाय अकोळनेर येथील इंडियन
ऑईल व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांमधून दररोज शेकडो इंधन टँकरची ये जा सुरु असते.
या शिवाय खडी वाहतूक करणारे ढंपरही दररोज रात्रंदिवस धावत असतात.
या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली
आहे. त्याचा या परिसरातील गावांमधील नागरिकांना प्रचंड मनस्ताप
सहन करावा लागत आहे.
गेल्या ४-५ वर्षात या रस्त्याच्या दुर्दशेकडे बांधकाम विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कायमच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे अर्धवट स्थितीत बंद पडलेले काम तातडीने सुरु करून किमान मोठ मोठे खड्डे तरी बुजवावेत अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुतार यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर ७ दिवसांत काम मार्गी लागले नाही तर परिसरातील विविध गावांमधील नागरिक रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, विलास शेडाळे, विठ्ठल हंडोरे, राहुल जाधव, जीवन हजारे, अमोल वाव्हळ, प्रदीप झरेकर, नाना गाढवे, सोमनाथ मेहेत्रे आदींनी दिला आहे.
नगर - राळेगण - मांडवगण रस्त्याची पण अतिशय दुरावस्था झालेली आहे.
ReplyDeletePost a Comment