'सिव्हील' मधील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यात दोघांना पोलिसांकडून अटक



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना पाथर्डी तालुक्यातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. सुदर्शन शंकर बडे (वय ३२, रा. येळी, ता. पाथर्डी) व सागर भानुदास केकान (वय २९, रा. खेरडे, ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्‍यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रूग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरली. त्याव्दारे कर्णबधीर असल्याचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला होता. या प्रकरणी जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी तालुक्यातील सागर भानुदास केकान, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, गणेश रघुनाथ पाखरे यांच्यासह जिल्हा रूग्णालयातील दोन कर्मचार्‍यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जिल्हा रूग्णालयातील एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. तसेच या गुन्ह्यातील तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. मात्र सुदर्शन बडे व सागर केकान हे दोघे पोलिसांना अनेक दिवसांपासून चकवा देत होते. बडे हा त्याच्या येळी येथील घरी आली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला गुरूवारी (दि. १० एप्रिल) रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर केकान याला पाथर्डीतील एका मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करून शुक्रवारी (दि. ११ एप्रिल) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. उपनिरीक्षक पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments