नगर तालुका (प्रतिनिधी) - घरात घुसून घरामध्ये एकटी असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व सोन्याच्या मण्याची पोत असा २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने ओरबडून चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील आगडगाव येथील टोकेवाडी येथे ९ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत विकास तुळशीराम कराळे (वय ५२, रा. टोकेवाडी, आगडगाव, ता. नगर, हल्ली रा. त्रिमूर्ती चौक, सारसनगर, अ.नगर ) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की त्यांच्या मूळ गावी आगडगाव परिसरातील टोकेवाडी येथे फिर्यादीची आई कमल तुळशीराम कराळे या घरी एकट्या असताना रात्री ८ वाजल्याच्या सुमारास एक २० ते २५ वयाचा, अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला व तोंडाला काळ्या रंगाचा मास्क लावलेला अनोळखी तरुण घरात घुसला.
त्याने घरात एकट्या असलेल्या कमल कराळे यांच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व एक सोन्याची पोत असा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला. या घटनेनंतर त्यांनी आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी फिर्यादी विकास कराळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कराळे हे तातडीने गावी गेले. त्यांनी माहिती घेवून नगर तालुका पोलिस ठाण्यात येवून रात्री उशिरा फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध बी एन एस २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.
Post a Comment