या पठ्ठ्याची होतेय गावभर चर्चा... ३५ टक्के काठावर पास, सर्व विषयांत ३५ गुण घेऊन झाला बारावी उत्तीर्ण



सांगली - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला असून, यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. 94.58 टक्के बारावीतील मुली अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचा 89.51 टक्के निकाल लागलेला आहे. राज्यातील बारावी पास मुलांचे कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका पठ्ठ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेत केवळ पास होण्यापुरते म्हणजेच 35 टक्के गुण मिळाले आहेत. त्याने प्रत्येक विषयात 35 मार्क पाडत हा विक्रम केला आहे.

हेमंत किरण सटाले असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील रहिवासी आहे. हेमंतने यंदाच्या बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात काठावर पास होण्यापुरते म्हणजेच केवळ 35 मार्क मिळवले आहेत. यामुळे त्यांची गावभर चर्चा सुरू झाली आहे. हेमंत हा व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नॉलॉजी विभागाचा विद्यार्थी असून त्याने इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयांचा पेपर दिला होता.

या सर्व विषयांत त्याला केवळ पासिंग पुरते म्हणजेच 35 गुण मिळाले आहेत. त्याला एकूण 600 गुणांपैकी 210 गुण मिळवत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हेमंतने आपले बारावीचे शिक्षण दिघंजी येथील इंद्रभाग्य पद्मिनी महाविद्यातून शिक्षण घेतले आहे. 35 टक्के काठावर पास झालेल्या हेमंत सटालेची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याच्या मार्क्सशी जोरदार चर्चा रंगली आहे.

1/Post a Comment/Comments

Post a Comment