ऐन घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकची चार वाहनांना धडक; चार जण जखमी


करंजी – पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील माणिकशहा पिरबाबा दर्ग्याजवळील अवघड वळणावर एका ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने त्याने इनोव्हा कार,एसटी बस व दोन पिकअप या चार वाहनांना धडक दिली.या अपघातात एसटी बस मधील दोन प्रवासी तर इनोव्हा कारमधील दोघे जण जखमी झाले.या अवघड वळणावर अपघाताची मालिका सुरूच आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील माणिकशहा पिरबाबा दर्ग्याजवळील अवघड वळणावर नगरहून पाथर्डीला जात असलेला ट्रक (एमएच १६ सीए-२३२४) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने घाटातून नगरकडे जात असलेल्या एका इनोव्हा कार,एसटीबस व दोन पिकअप वाहनांना धडक दिली. पाथर्डी-कल्याण या बसमधील दोन प्रवाशी तर इनोव्हा कारमधील दोन प्रवाशी जखमी झाले. जखमींना तिसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. विठ्ठलवाडी आगाराची बस पाथर्डीवरुन कल्याणकडे जात होती. या बसमध्ये ३३ प्रवाशी होते. सुदैवाने या विचित्र अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

या अपघातात वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे घाटात सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मध्यभागी धडकल्याने घाटातून एकेरी वाहतूक चालू होती. यावेळी काही स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. करंजी घाटातील या अवघड वळणावर नेहमीच अपघातात होत असल्याने करंजी घाटातील या वळणाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक वेळा करण्यात येऊनही याबाबत अद्याप कोणतीच दखल न घेतल्याने प्रवाशी व स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच येथे पेट्रोलचे टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला होता.या महामार्गावरील करंजी घाटाच्या पायथ्याशी महामार्ग पोलिसांची चौकी असूनही पोलिस मात्र अपघातस्थळी उशिरा पोहचले. घाटाच्या पायथ्याशी महामार्ग पोलिसांची चौकी आहे.मात्र अपघात झाल्यानंतरच पोलिस चौकी उघडी दिसते.

 

0/Post a Comment/Comments