शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत: रायगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील ११, तमिळनाडूतील जिंजीचा ही समावेश



मुंबई - महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. 

जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट १२ किल्ले
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी

किल्ले जागतिक वारसा यादीत घेण्यासाठी २०देशांचे मतदान

आपल्या सर्वांकरिता ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे १२ किल्ले युनेस्कोकरिता नॉमिनेट केले होते. युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचे होते. या २० ही देशांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरिता मतदान केले आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीत आलेले आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, हिंदूस्थानकरिता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट असून गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

युनेस्को सदस्य राष्ट्रांनी किल्ल्यांचे महत्त्व मान्य केले

महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधील बैठकीमध्ये जागतिक युनेस्कोचे सदस्य असलेल्या सर्व राष्ट्रांनी किल्ल्यांचे महत्त्व मान्य केले, त्याला समर्थन दिले आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसाचे मानांकन मिळाले. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, भारतीय पुरातत्त्व विभाग, संस्कृती मंत्रालय आणि आमचे सांस्कृतिक विभाग आणि युनेस्कोमधील भारतीय प्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा जागतिक सन्मान साकार झाला आहे. ही फक्त गड किल्ल्यांची नाव नाहीत, तर स्वराज्याच्या ध्येयासाठी महाराजांनी उभारलेल्या स्थापत्यशास्त्राची शिखरं आहेत. या दुर्गरचना म्हणजे युद्धनीती, मुत्सद्दीपणा आणि रक्षणशक्ती यांचे अभूतपूर्व उदाहरण आहेत. हा ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा आहे, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले.

राज्याच्या शिष्टमंडळाने फेब्रुवारीत दाखल केला होता प्रस्ताव

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार यांनी केले. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश होता.

महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात आले होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या १२ किल्ल्यांचा आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला.

0/Post a Comment/Comments