गुटखा बनविण्यासाठी गुजरातला जात असलेला सुपारी व तंबाखुचा मोठा साठा पकडला, ८ कोटी ४३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त



अहिल्यानगर - कर चुकवून आणलेली गुटखा बनविण्यासाठी लागणाऱ्या सुपारी व तंबाखुचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात पकडला आहे. या कारवाईत तब्बल  ८ कोटी ४३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंधाची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुसार या कारवाई साठी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, भिमराज खसे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सतिष भवर, सुनिल मालणकर, महादेव भांड, उमाकांत गावडे यांचे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. सदर पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, गुटखा बनविण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी, तंबाखू असे अवैध रित्या कर्नाटक मधून आणून तेथुन गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी शासनाचा कर चुकवून व बनावट बिले तयार करुन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चिंचोली (ता. राहुरी) गांवचे शिवारात हॉटेल महालक्ष्मी, चौधरी पॅलेस येथे सापळा रचून वाहने व ट्रक चालक यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यामध्ये अबरार अल्लाउद्दीन खान (वय ३० वर्षे, रा. साखरस, ता. फिरोजपुर, जिल्हा नुह, हरियाण) तोफिक हनिफ खान (वय ३० वर्षे, रा. बिरसिका, ता. जि. नुह, हरियाणा), अक्रम इसब खान (वय २८ वर्षे, रा. बिलंग, ता. कामा, जि. भरतपुर, राजस्थान), इर्शाद ताजमोहमंद मेह (वय ३०, रा. उंबरी, ता. फिरोजपुर, जि. नुह, हरियाना), अशोक पोपट पारे (वय ४७ वर्षे, रा. मिरजगांव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), रखमाजी लक्ष्मण मगर (वय ३४ रा. पाटेगांव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), कालीदास बाबुराव काकडे (वय ६३, रा. मु.पो. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापुर), आसिफ पप्पु मेव (वय २६ रा. आकेडा, ता. नुह, हरियाणा), जमशेर अब्दुल रज्जाक खान (वय ४५ रा. करवडी, ता. पुनाहना, जि. मेवाद, हरियाना), सचिन जिजाबा माने ( वय ३९ रा. ५०० बंगला, शेजारी, केडगांव, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. 

ट्रकमध्ये लाल सुपारी व तंबाखू असल्याचे दिसून आले. चालकांकडे त्यांचे ताब्यातील सुपारी व तंबाखूबाबत विचारपुस करता त्यांनी सदरची सुपारी व तंबाखु ही वाहन मालक मोहंमद अक्रम (रा. कर्नाटक) याची असून त्यांचे सांगणेप्रमाणे सदरची सुपारी व तंबाखु ही गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी नेत असल्याचे सांगितले, त्यांचेकडे सुपारी व तंबाखू वाहतुक परवान्याबाबत बाबत विचारपूस करता त्यांचेकडे कोणतेही ई वे बिल मिळून आले नसुन बिल्टीची पाहणी करता सदरची बिल्टी ही संगणीकृत नसुन हस्तलिखीत बनावट तयार करण्यात आल्याचे व माल पोचविण्याचा पत्ता दिल्ली असा नमूद केलेला आहे. 

त्यामुळे वरील ट्रक चालकांकडे मिळून आलेली सडलेली लाल सुपारी व तंबाखु ही कर चुकवून व बनावट बिले तयार करुन आणली असल्याची प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोलिसांनी ६ कोटी १७ लाख ८५ हजार रुपये किमतीची २.०५.९५० किलो लाल सुपारी, १५ लाख ६० हजार रुपये किमतीची ७८०० किलो तंबाखु व २ कोटी १० लाख रुपये किमतीचे १३ वाहने असा एकुण ८ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन मिळुन आलेली सुपारी व तंबाखु बाबत खात्री करुन कारवाई करणेबाबत राज्य कर सह आयुक्त, वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पुढील कारवाई वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांचे मार्फतीने करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments