नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बैलपोळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र यावेळी गावाचे सरपंच शरद पवार यांनी या उत्सवाला वेगळाच सामाजिक व राजकीय संदेश जोडला. त्यांनी बैलांची सजावट करताना मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे अशी वाक्ये लिहिली होती. तसेच सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढताना या दोन्ही मागण्यांच्या घोषणाही दिल्या.
सरकारने निवडणूक काळात दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरपंच पवार यांनी “सर्जा” या बैलावर मराठा आरक्षण व सातबारा कोरा कोरा कोरा अशी घोषवाक्ये रेखाटून सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा मांडली. निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न झाल्याने सरपंचांनी शासनाचे लक्ष वेधले.
“बळीराजाच्या खांद्यावरचे शेताचा भार संसाराचा भार आणि खोट्या आश्वासनाचा भार वाहतो आहे. हा भार हलका करणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. सातबारा कोरा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसा, अन्यथा जनता सरकारवर कोरा विश्वास ठेवणार नाही. सातबारा वरील ओझे कमी करावे, अन्यथा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये, सरकारने तातडीने सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी ठाम मागणी सरपंच शरद पवार यांनी केली.
या अनोख्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या बैलपोळ्याने शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा अग्रस्थानी आणले आहेत. यावेळी चिचोंडी पाटील येथील सर्व पदाधिकारी पवार व पाटील परिवारातील सदस्य, ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मंगलमय वातावरणात बैलांच्या सजावटीतून बैल जोडी असणारे शेतकरी चिचोंडी पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मारुती मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वाजत गाजत येणाऱ्या बैल जोड्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
Post a Comment