पुणे - पुण्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे.
शैक्षणिक शहर अशी ओळख असलेले शहर गुन्हेगारीचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी छोट्या-मोठ्या गुंडांची धिंड काढत अटक करण्याचे
सत्र सुरू केले असतानाच कुख्यात गुंड नीलेश घायवळ मात्र परदेशात पळून गेल्याची
माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कोथरूड येथे गोळीबार झाला होता, या प्रकरणी नीलेश घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र,
त्यापूर्वीच नीलेश घायवळ परदेशात पळून गेला असल्याचे समजते.
कोथरूड
गोळीबार प्रकरणानंतर पुन्हा एकदा घायवळ टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तसेच या टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई
करण्यात येणार आहे. परंतु, नीलेश
घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या
घटनेमुळे नीलेश घायवळला पासपोर्ट मिळाला तरी कसा? असा प्रश्न
उपस्थित होत आहे. यावर घायवळने पासपोर्ट जमाच केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले
आहे.
कोथरूड
गोळीबार प्रकरणी नीलेश घायवळ याच्यासह इतर 10 जणांवर
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी
कायद्यानुसार कारवाई केली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यापासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर एका तरुणावर गोळीबार करण्यात
आला होता. या प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत,
चदिलकर, फाटक, व्यास
यांना अटक करण्यात आली असून इतर आरोप फरार आहेत. त्यांचा तपास सुरू असून नीलेश
घायवळ सुद्धा आता परदेशात पळून गेला असल्याचे समोर आले आहे.
भारतात
येताच अटक करण्यात येईल
नीलेश
घायवळ याने आपले पासपोर्ट जमा केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नीलेश घायवळ
हा उच्चशिक्षित गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्या, खंडणी, अपहरण,
मारामारी यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद घायवळवर आहे. आता नीलेश
घायवळवर लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात
येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नीलेशने
गुन्हेगारी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला असून त्याचे लंडनमध्ये
सुद्धा घर आहे. त्याचा मुलगा सुद्धा हायफाय शाळेत शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी
सांगितले आहे.
कोथरूड
गोळीबार प्रकरण काय आहे?
कोथरुड
येथे एका क्षुल्लक वादातून गोळीबाराची घटना घडली होती. मुठेश्वर मित्र मंडळासमोर 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.40 वाजता रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या लोकांनी दुचाकीला जाण्यासाठी जागा
दिली नाही, या कारणावरून झालेल्या वादावादीतून प्रकाश मधुकर
धुमाळ (36, रा. थेरगाव) नावाच्या तरुणावर गोळी झाडण्यात आली,
ज्यात तो जखमी झाला. यानंतर, याच आरोपींनी एका
जुन्या वादातून आणखी एका व्यक्तीच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी
केले. या दोन्ही गंभीर घटनांप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी नीलेश घायवळसह इतर 10 जणांवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधान
परिषदेचे सभापती राम शिंदेंसोबत नीलेश घायवळ
कोथरूड
गोळीबार प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी
टीका करत एक ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न
दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला
जखमी केले. आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात
की हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे म्हणून त्याला हमखास
पाठीशी घालतात, हेच पहायचे आहे! या कारवाईनंतर हे सरकार
सामान्य माणसाचे आहे की गुंडांचे हे कळणार आहे, असे त्यांनी
म्हटले होते.
Post a Comment