काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवलेला ४५० गोण्या रेशनिंगचा तांदुळ पकडला


अहिल्यानगर - दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाचा साठा करुन विक्री करणाऱ्या आरोपीकडुन ४५० गोण्या तांदळासह ११ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई भानसहिवरे (ता. नेवासा) येथे १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.  

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन कारवाई साठी पाठविले होते.

सदर पथक हे १७ ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यात अवैध धंद्यांची माहिती काढत असतांना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, संदिप सुभाष शिंदे (रा. भानसहिवरे ता. नेवासा) याने भगवान पुंड (रा. करजगांव) तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकादार यांचेकडुन विनापरवाना रेशनिंगाचा तांदुळ खरेदी करुन सदरचा तांदुळ हा संजय अग्रवाल यांच्या गजानन ऍग्रो, करोडी ता.जि.छत्रपती संभाजीगनर येथे विक्री करण्याकरीता त्याचे भानसहिवरे गावातील गोडावुनमध्ये साठवणुक करुन ठेवला आहे.

पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नेवासा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.अमोल पवार तसेच पंचासमक्ष भानसहिवरे येथील संदिप सुभाष शिंदे याचे गोडावुन वर छापा टाकला. या गोडावून मध्ये ४५० गोण्यामध्ये एकुण २२ हजार ५०० किलो तांदुळ आढळून आला. त्याची किंमत ११ लाख २५ हजार एवढी आहे. हा सर्व तांदूळ जप्त करण्यात आला. या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात पो.कॉ.प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादी वरून संदीप शिंदे याच्या विरुद्ध जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments