नगर – मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या केडगाव ते घोसपुरी रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड दुर्दशा झालेली आहे. रस्ता अनेक ठिकाणी खचून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवताना वाहन चालकांचे अपघात होत असून खड्डयांमुळे वाहनचालकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअरपार्ट खिळखिळे होत आहेत. या रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील ६ गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकोळनेर येथील पेट्रोलियम डेपो जवळील चौकात सुमारे ३ तास रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी दोन्ही डेपो मधून डिझेल पेट्रोल घेवून जाणारे शेकडो टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
केडगाव घोसपुरी रस्त्यावर सोनेवाडी बायपास चौकापासून पुढे थेट घोसपुरी पर्यंत ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर सोनेवाडी, अकोळनेर भोरवाडी, जाधव वाडी, सारोळा कासार, घोसपुरी, अस्तगाव आदी गावांतील नागरिक प्रवास करत असतात. तसेच नगर शहर, केडगाव व इतर ठिकाणाहून या गावांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक, अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी ही प्रवास करत असतात.
या शिवाय अकोळनेर येथील इंडियन ऑईल व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांमधून दररोज शेकडो इंधन टँकरची ये जा सुरु असते. या शिवाय खडी वाहतूक करणारे ढंपरही दररोज रात्रंदिवस धावत असतात. या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्याचा या परिसरातील गावांमधील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या ४-५ वर्षात या रस्त्याच्या दुर्दशेकडे बांधकाम विभागाकडून कायमच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच लवकरात लवकर मजबुतीकरण, कॉक्रीटीकरण करण्यात यावे या मागणीची निवेदने मागील आठवड्यात बांधकाम विभागाला देण्यात आली होती. अकोळनेर चे सरपंच प्रतिक शेळके यांच्या पुढाकाराने या सर्व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येत १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकोळनेर येथील पेट्रोलियम डेपो जवळील चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे अभियंता श्री. सुतार, दोन्ही पेट्रोलियम डेपोचे अधिकारी तसेच नगर पारनेर मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी आंदोलन स्थळी येवून निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना आ.दाते म्हणाले, बांधकाम विभागाला सूचना दिल्याने या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्ती साठी ४२ लाखांची निविदा प्रसिद्ध झालेली आहे. यातून खड्डे बुजविण्यात येतील तसेच आपण तातडीने पालकमंत्री, बांधकाम मंत्री यांच्याशी चर्चा करू तसेच या रस्त्यावर पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरची वाहतूक जास्त असल्याने या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवू. राज्य सरकार कडेही पाठपुरावा केला जाईल. सर्व बाजूंनी पाठपुरावा करून या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
Post a Comment