अहिल्यानगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे आदर्शगाव म्हणून देशभरात ओळखले जाणारे हिवरेबाजार हे गाव पुन्हा एकदा राज्याच्या पातळीवर उजळून निघाले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शंभर टक्के (१००%) लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड तयार करणारे राज्यातील पहिले गाव बनून हिवरेबाजारने नवा इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कार्यगौरवाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हिवरेबाजारला 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. ओमप्रकाश शेटे, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. हिवरेबाजार ग्रामपंचायती तर्फे डॉ. पोपटराव पवार, सरपंच विमलताई ठाणगे, रो. ना. पादीर, छबुराव ठाणगे, एस.टी. पादीर, सहदेव पवार, जालिंदर चत्तर, राजू ठाणगे मेजर, गोपीनाथ पवार, अशोक गोहड, बाळू गोहड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने 'प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुरक्षा मिळावी या ध्येयाने सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध व सामूहिक प्रयत्न केले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व पात्र नागरिकांची १००% नोंदणी व कार्डनिर्मिती करून हिवरेबाजारने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसमोर एक आदर्श आरोग्य व्यवस्थेचे मॉडेल सादर केले. या यशामागे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामस्थ यांचे एकत्रित श्रम आणि जनसहभाग हा महत्त्वाचा घटक ठरला. हिवरेबाजारने केवळ आयुष्मान कार्ड तयार करून थांबले नाही, तर त्याचा उपयोग, जनजागृती, आरोग्य शिबिरे, रोगप्रतिबंधक मोहिमा, महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम यांद्वारे ग्राम आरोग्य सुधारण्यात उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य यंत्रणेत पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामसभेच्या माध्यमातून जनसहभाग यावर आधारित ही आरोग्य प्रणाली आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
पुरस्कार स्वीकृतीवेळी डॉ. पोपटराव पवार म्हणाले, हा सन्मान हिवरेबाजारच्या प्रत्येक ग्रामस्थाचा आहे. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभशेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी असून हिवरेबाजार भविष्यातही आरोग्य क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल. हिवरेबाजारची आरोग्यव्यवस्था ही केवळ योजनापुरती मर्यादित नसून, ती गावाच्या सर्वांगीण विकासाची दिशा दर्शवणारी प्रणाली ठरत आहे. या उपक्रमामुळे हिवरेबाजार आता "आरोग्यसंपन्न गाव' म्हणून नावारूपास येत असून, 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य पुरस्कार हा सन्मान हिवरेबाजारच्या आरोग्य जनजागृती, शंभर टक्के आयुष्मान कार्ड निर्मिती, सातत्यपूर्ण प्रगतीशील कार्य आणि ग्रामस्वराज्याच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे. हिवरेबाजारच्या या कामगिरीतून राज्यातील अन्य ग्रामपंचायतींना प्रेरणा मिळत असून, "आरोग्यदायी महाराष्ट्र' या संकल्पनेला बळकटी प्राप्त होत आहे. शासनाच्या योजनांचा प्रभावी अंमल ग्रामपातळीवर कसा साधता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे-हिवरेबाजार!
Post a Comment