नगर तालुक्यात महाआघाडीच्या १५ वर्षांच्या सत्तेला महायुती सुरुंग लावणार का? उत्सुकता शिगेला



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यात सन २००७ पासून झालेल्या तीन ही निवडणुकीत आ.शिवाजी कर्डीले विरूद्ध सगळे अशी परिस्थिती राहिलेली आहे. राज्यात महाविकास आघाडी २०१९ मध्ये अस्तित्वात आली असली तरी नगर तालुक्यात ती २००७ च्या जि.प.निवडणुकीपासुन अस्तित्वात आलेली आहे.सलग ३ निवडणुकांमध्ये नगर पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता राहिलेली आहे. मात्र यावेळी महाआघाडीच्या १५ वर्षांच्या सत्तेला महायुती सुरुंग लावणार का? त्यासाठी कोणत्या युक्त्या लढविल्या जाणार? कोणते डावपेच टाकले जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या. निंबळक व वाळकी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तर नवनागापूर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समिती गणामध्ये चिचोंडी पाटील, चास, वाळकी, गुंडेगाव हे गण खुले झाले आहेत. जेऊर गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे तेथून इच्छुक असलेल्या भाजपचे युवानेते अक्षय कर्डिले वाळकी गटाकडून लढण्याची शक्यता आहे.

नवनागापूर, केकती, निंबळक या गणांमधून पंचायत समिती सभापतिपदाच्या दावेदार निवडणूक लढतील. वाळकी गटातून बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व शरद झोडगे यांचे गट व गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील राजकीय क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत राज्यातील सत्ताधारी गटाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तालुक्यातील बहुतांशी संस्थांचे नेतृत्व आहे. महाविकास आघाडीला जन्म देणारे माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या निधनानंतर आघाडीत विस्कळीतपणा आला आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीतील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह रामदास भोर, डॉ. दिलीप पवार, शरद झोडगे, गुलाब शिंदे यांनी शिंदे गटाशी जवळीक केली आहे. त्यामुळे महाआघाडीची ताकद कमी झालेली आहे. परंतु हा गट काय भूमिका घेणार हे पाहणे ही औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाळकी व निंबळक या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये मोठे राजकीय घमासान होणार आहे. निंबळक गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, अरुण होळकर यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके तसेच विजय शेवाळे, आप्पासाहेब (बंडू) सप्रे यांच्या नावाची चर्चा आहे. जेऊर गटातून माजी सदस्या भाग्यश्री मोकाटे यांच्याबरोबरच जेऊर व घाटाखालील गावातून इच्छुकांची संख्या जास्त आहे.

असे आहे तालुक्यातील आरक्षण 

जिल्हा परिषद गट - निंबळक व वाळकी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, नवनागापूर - सर्वसाधारण (महिला), जेऊर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), नागरदेवळे व दरेवाडी- अनुसूचित जाती (महिला). पंचायत समिती गण - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग- देहरे, सर्वसाधारण महिला - नवनागापूर, केकती, निंबळक, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला- बु-हाणनगर, जेऊर. अनुसूचित जाती- नागरदेवळे, अनुसूचित जाती महिला - दरेवाडी, सर्वसाधारण- चिचोंडी पाटील, चास, वाळकी, गुंडेगाव.

‘वाळकी’तील कार्यकर्त्यांचे कर्डिले यांना साकडे

वाळकी जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील तीन टर्मपासून या गटावर वर्चस्व ठेवणारे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्याविरोधात बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे यांना पुढे केले होते. सोडतीनंतर चित्र बदलले आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याबाबत कर्डिले यांच्या बंगल्यावर वाळकी गटातील कार्यकर्त्यांच्या चकरा सुरू झाल्या असून, कर्डिले यांनी लढावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

0/Post a Comment/Comments