नगर तालुका (प्रतिनिधी) - गावात सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी घराला कुलूप लावून गेलेल्या कुटुंबाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ५८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत संदीप मारुती खर्से (वय ४२, रा. कौडगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय हे १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घराला कुलूप लावून गावात सुरु असलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेले होते. रात्री १० वाजता ते पुन्हा घरी आले, तेव्हा त्यांची पाळीव जनावरे घराच्या परिसरात मोकळी फिरताना आढळली. त्यांनी घराचा दरवाजा पाहिला असता त्याला लावलेले कुलूप तुटलेले दिसले.
नंतर त्यांनी घरात जावून पाहिले असता घरात सर्वत्र उचकापाचक केल्याचे त्यांना दिसून आले. घरातील गोदरेज चे कपाट ही उघडे दिसले. त्या कपाटातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व ३० हजारांची रोकड असा १ लाख ५८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर खर्से यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment