आ.संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवणार - अजित पवार


मुंबई - सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच नाराज झालेत. या प्रकरणी त्यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. संग्राम जगताप यांना आम्ही यापूर्वीही समजावून सांगितले होते. पण त्यात सुधारणा दिसून येत नाही. त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे विचार आहेत, ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे अजित पवार आपला संताप व्यक्त करताना म्हणालेत.

आमदार संग्राम जगताप यांनी आगामी सणासुदीच्या काळात जनतेला केवळ हिंदू लोकांच्याच दुकानांतून खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे अहिल्यानगरात मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी असे वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी सुद्धा असे प्रक्षोभक विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना समजावून सांगितले होते. पण आता पुन्हा जगताप यांनी कट्टर हिंदुत्त्ववादी विचार प्रकट करून राष्ट्रवादीच्या विचासरणीला फाटा दिला आहे. यामुळे अजित पवार चांगलेच संतप्त झालेत.

संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला मान्य नाहीत

अजित पवारांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. ते म्हणाले, खरेतर अरुणकाका जगताप हयात होते तोपर्यंत तिथे सर्वकाही सुरुळीत होते. पण आता काही लोकांवरील जबाबदारी वाढली आहे. आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यावेळी आपण अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. बोलले पाहिजे. हा महाराष्ट्र शिव - शाहू - फुले आंबेडकरांचा आहे. हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा त्याला समजावून सांगितले होते. त्यावर त्यानेही मला सुधारणा करण्याचा शब्द दिला होता.

पण काहीही सुधारणा होताना दिसून येत नाही. त्यांचे विधान अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे विचार आहेत, ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. एकदा पक्षाची ध्येयधोरणे ठरल्यानंतरही पक्षाच्या विचारधारेपासून कोणत्याही खासदार किंवा आमदारांना अथवा जबाबदार व्यक्तींना अशा प्रकारची वक्तव्य करता येणार नाहीत, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात संग्राम जगपात यांच्या पक्षपातळीवरील अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments