अहिल्यानगर - वारंवार गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या शहरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही जिल्ह्यातील अशा प्रकारची पाचवी हद्दपार केलेली टोळी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
हद्दपार करण्यात आलेल्या टोळीत टोळीप्रमुख मुनाफ चाँद शेख (रा.जेऊर बायजाबाई, ता. नगर) तसेच टोळी सदस्य सलमान अजीज शेख (रा. घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर) आणि इकलास मुनाफ शेख (रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) यांचा समावेश आहे. या तिघांनी एकत्र येऊन गुन्हेगारी टोळी तयार करून नगर शहर व एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करणे, मांस विक्री करणे, बेकायदेशीर वाहतूक करणे, जमाव जमवून घातक हत्यारांसह हल्ले करणे तसेच महिलांशी गैरवर्तन करणे असे गंभीर गुन्हे केले होते.
या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास किंवा साक्ष देण्यास घाबरत होते. टोळीचे गैरकृत्य वाढत असल्याने भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी करून शिफारस केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तिघांनाही अहिल्यानगर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. टोळी प्रमुख व सदस्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत.
अशा संघटित गुन्हेगार टोळ्यांवर सातत्याने नजर ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हद्दपारीची कारवाई सुरू आहे. आणखी गुन्हेगार टोळ्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

Post a Comment