‘इंस्टा’ वरील प्रसिद्ध रील स्टार निघाली सराईत गुन्हेगार, बंटी- बबलीच्या जोडीला ‘एलसीबी’ने ठोकल्या बेड्या

 


अहिल्यानगर - इंस्टाग्राम वर प्रसिद्धीच्या झोतात आलेली रील स्टार बस प्रवासात महिलांचे दागिने, पर्स चोरायची आणि त्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या प्रियकराकडे द्यायची. अगदी सिनेमातील बंटी- बबली प्रमाणे त्यांचा सुरु असलेला उद्योग नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. रील स्टार असलेली कोमल नागनाथ काळे (वय १९, रा. पाथर्डी रोड, भिमसेननगर, शेवगांव) आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (वय २५, मुळ रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी, हल्ली रा.शंकरनगर शेवगांव) या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.      

जिल्ह्यात बस प्रवासात महिलांचे दागिने, पैसे चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. १९ नोव्हेंबर रोजी सौ. अलका मुकुंद पालवे (रा. देवराई, ता. पाथर्डी) या त्यांचे कामनिमित्त पाथर्डी ते कल्याण एस.टी. ने पाथर्डी येथुन प्रवास करीत असतांना, कोणीतरी अनोळखी महिलेने त्यांचे दागिने व पैसे असलेली पर्स चोरी केली होती. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना  जिल्ह्यामध्ये झालेल्या बसमधील चोरी व बस स्थानक परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

या सुचनेनुसार पो.नि. कबाडी यांनी स.पो.नि. हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालींदर माने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांचे पथक नेमून तपास सुरु केला.

या पथकाला तपास करताना गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथर्डी शहरातील नवीन बस स्टॅन्ड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले. पथकाने तिला शिताफीने ताब्यात घेतले. ती संशयित आरोपी कोमल नागनाथ काळे होती. तिच्या कडे कसून चौकशी केल्यावर तिने चोरी केलेला मुद्देमाल हा तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर याचेकडे दिला असल्याचे सांगितले  आहे. त्यानंतर  पथकाने आरोपी सुजित चौधर याचा  शोध घेत त्यास ताब्यात घेतले त्यास त्याची प्रियसी कोमल काळे हिने बसमधील महिलांचे पर्समधील चोरी केलेल्या सोन्याचे दागिणे व रोख रक्कम बाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, कोमल हिने चोरी केलेल्या रोख रक्कमेतुन आम्ही १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा आय फोन १७ प्रो मॅक्स मोबाईल व १५ हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतला होते. तसेच ७ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे माझ्याकडे दिले होते. त्याप्रमाणे आरोपीकडुन वर नमुद मोबाईल, सोन्याचे दागिणे व  २२३० रुपये रोख रक्कम असा एकुण ९ लाख ३५ हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच महिला आरोपी कोमल काळे  व आरोपी सुजित चौधर  यांना विश्वासात घेवुन आणखी गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी अमरापुर ते शेवगाव जाणारे बसमध्ये १८ ऑक्टोबर रोजी पर्समधुन सोन्याचे दागिणे चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच  २० नोव्हेंबर रोजी पाथर्डी ते भगुर जाणारे बसमधुन एक महिलेचे पर्समधुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली असल्याचे सांगितले.सदर दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

इंस्टाग्राम वर आहेत ५० हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स

सदर गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल नागनाथ काळे हि रिलस्टार असुन तिचे इंस्टाग्राम वर ५० हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच बसमध्ये प्रवास करत असतांना कोणत्याही अनोळखी भोळ्या भाबड्या चेहऱ्याच्या महिला व इसमावर विश्वास ठेवु नका व आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


0/Post a Comment/Comments