घोसपुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी, शिवकालीन खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष



नगर – नगर तालुक्यातील घोसपुरी येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवकालीन खेळांच्या प्रभावी प्रात्यक्षिकांनी झाली. यामध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी-काठी तसेच ज्वलंत काठीचे थरारक प्रदर्शन सादर करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी या खेळांना भरभरून दाद दिली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोसपुरी येथील विद्यार्थ्यांनी आकर्षक किल्ले प्रदर्शन सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक झाले. महिलांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आले. लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावर सादर केलेला नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरला.

पुढे महाराजांची महाआरती संपन्न झाली. शिवव्याख्यात्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थितांना इतिहासाची उजळणी व प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

गावातील सर्व घटकांच्या सहभागामुळे शिवजयंती सोहळा यंदा विशेष उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले. 

हे ही वाचा ...

ऐन रमजानमध्ये पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; १७ जणांचा मृत्यू

0/Post a Comment/Comments