केडगावच्या अभिषेक टेकाडेचे 'यूपीएससी' परीक्षेत यश, मिळवली ६१० वी रँक



अहिल्यानगर - केडगाव येथील अभिषेक अशोक टेकाडे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत ६१० वी रँक मिळवत पाचव्या प्रयत्नात यश संपादन केले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, संयम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे हे यश मिळाल्याची भावना अभिषेकने व्यक्त केली आहे.

केडगावमधील पाच गोडाऊन परिसरात राहणाऱ्या अभिषेकचे माध्यमिक शिक्षण अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व भाऊसाहेब फिरोदिया कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर पुणे येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

शालेय जीवनापासूनच त्याने 'यूपीएससी' परीक्षेचे ध्येय निश्चित केले होते. इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर त्याने नोकरी न करता  सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचण्याची सवय त्याने लावून घेतली. विशेष म्हणजे अभिषेकने कोणत्याही क्लासचा आधार न घेता स्वतःच्या मेहनतीवर घरीच अभ्यास केला. दररोज किमान सहा ते सात तास अभ्यास, टेस्ट सिरीज सोडवणे, मुलाखतींचा सराव तसेच पेपर सोडवताना व मुलाखतीत होणाऱ्या त्रुटी सुधारण्यावर त्याने विशेष लक्ष दिले.

ऑनलाइन अभ्यासापेक्षा पुस्तक वाचनाला त्याने अधिक प्राधान्य दिले. स्मार्टफोनवरील सोशल मीडियापासून तो पूर्णपणे दूर राहिला. यापूर्वी त्याने 'यूपीएससी' ची परीक्षा चार वेळा मुख्य परीक्षेपर्यंत दिली होती. यंदा त्याला मुलाखतीची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करत त्याने ६१० वी रँक मिळवत यश मिळवले.

अभिषेकचे वडील अशोक टेकाडे यांनी सांगितले की, मागील सहा वर्षांपासून अभिषेकने नातेवाईकांकडे जाणे, फिरणे यासारख्या गोष्टी टाळून स्वतःच्या आवडीनिवडींना मुरड घालत पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले होते. त्याचा प्रवास निश्चितच कठीण होता; मात्र सातत्य आणि जिद्दीमुळे त्याने हे यश मिळवले. मुलाच्या यशाबद्दल बोलताना ते भावुक झाले.

अभिषेकच्या या यशामुळे केडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 

0/Post a Comment/Comments