अहिल्यानगर - माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ.यु.जे.मोरे यांनी १२ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावला आहे.
याबाबत शिरूर (जि.पुणे) येथील एका २५ वर्षीय विवाहित महिलेने २१ फेब्रुवारी रोजी पहाटे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महिला खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली होती. सोशल मीडियावरून तिने अभिषेक कळमकर याचा मोबाईल क्रमांक मिळवून नोकरीसंदर्भात संपर्क साधला. त्यावेळी त्याने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर काही दिवसांनी अभिषेकने एमआयडीसी परिसरात आपली शाळा असल्याचे सांगून शाळा दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. तिला एका काळ्या रंगाच्या वाहनात बसवून एमआयडीसीकडे घेऊन गेला. वाहनात असताना तिला शीतपेय दिल्यानंतर गुंगी आल्यासारखे झाले. त्यानंतर सुमसाम ठिकाणी वाहन थांबवून जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास नोकरी मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे. त्या नंतर १८ फेब्रुवारीला शिरूर येथील एका लॉज वर बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचे या फिर्यादीत म्हंटलेले आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक कळमकर फरार आहे. त्याच्या वतीने अॅड. विकास ढोकळे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ.यु.जे.मोरे यांच्या समोर झाली. पिडीतेचे वकील अॅड.विजय गुंदेचा यांनी अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध दर्शवत हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देवू नये असा युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. मोरे यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.

Post a Comment