नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील खडकी गावच्या शिवारात एक विचित्र घटना समोर आली आहे. अपघातामुळे रस्त्यात बेशुद्ध पडलेल्या एका तरुणाचा, तो असहाय्य असताना अज्ञात व्यक्तीने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील रहिवासी शामुवेल अशोक ठोंबरे हा तरुण बाबुर्डी बेंद येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण आटोपून घरी परतत असताना खडकी शिवारात त्याचा अपघात झाला. या अपघातामुळे शामुवेल रस्त्यावरच बेशुद्ध पडला होता. तो शुद्धीवर नसल्याचा फायदा घेऊन कोण्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या डाव्या खांद्याजवळ जोरात चावा घेतला.
शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच शामुवेल ठोंबरे याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खरात हे करत आहेत. भररस्त्यात जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीसोबत घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, पोलीस आता त्या अज्ञात विकृत व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Post a Comment