वीज तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे आग, १ एकर गहू जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान



नगर तालुका (प्रतिनिधी) - प्रमाणापेक्षा जास्त लूज असणाऱ्या वीजवाहक तारा एकमेकांना चिटल्याने लागलेल्या आगीत खडकी (ता.नगर) येथील सौ. रोहिणी प्रकाश निकम यांच्या शेतातील एक एकर पेक्षा जास्त गहूं जळून गेला. त्यामध्ये त्यांचे एक लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी (दि.९) दुपारी घडली.

खडकी गावठाण शेजारी रोहिणी प्रकाश निकम यांचे गट नंबर १५ चे क्षेत्र आहे. यामध्ये गहू असून तो काढणीला आला आहे. या शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारा खूपच खाली आलेल्या आहेत. या तारा व्यवस्थित कराव्यात अशी मागणी त्यांनी वारंवार महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे केलेली होती.पण कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान या वीजवाहक तारा एकमेकांना चिकटल्याने आगीचे लोळ गव्हाच्या पिकात पडले. 

काढणीला आलेला गहू पूर्णपणे वाळलेला असल्याने गव्हाने पेट घेतला आणि आग वाढत गेली. गव्हाचे शेत गावाच्या जवळ असल्याने .गावातील  चंद्रकांत कोठुळे (मेजर), अमित सुडगे, राहुल कोठुळे, तनवीर शेख, सुधाकर उमाप, केतन निकम, सुनिल कोठुळे, केतन रोकडे, निखिल निकम यांनी धावत गव्हाच्या शेतात शिरले आणि त्यांनी आग विझवली. पण तोपर्यंत एक एकर पेक्षा जास्त गव्हाचे पीक जळून गेले होते. यामुळे रोहिणी प्रकाश निकम यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


 

0/Post a Comment/Comments