अहिल्यानगर - केंद्रिय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) शुक्रवारी (दि.६) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून सहाजणांची निवड झाली आहे. ऋतुजा अशोक गायकवाड (संगमनेर, रँक १०६), अल्पेश भाऊसाहेब ढवळे ( निघोज, ता. पारनेर, रैंक ६८७), बापूसाहेब रतन गायकवाड (चास, ता. नगर, रँक ५६१), सिद्धार्थ लक्ष्मण तागड (नगर, रँक ६१९), निखिल तांबे (अरणगाव, ता. जामखेड, रँक ५१७), धनंजय दिघे (जोर्वे, ता. संगमनेर, रँक ५२९) यांनी जिल्ह्याची मान उंचावली आहे.
या वर्षी देशात एकूण ९५८ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यापैकी १८० उमेदवारांची निवड नागरी आयएएससाठी झाली आहे. सेवा परीक्षेची प्राथमिक परीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झाली. अंतिम मुलाखतीचा टप्पा ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू होता. मुख्य परीक्षेनंतर एकूण २ हजार ७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. अखेर शुक्रवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
आईच्या कष्टाचे चीज
पारनेर तालुक्यातील निघोज येथील अल्पेश ढवळे यांनी ६८७ वी रँक मिळवत आईच्या कष्टाचे चीज केले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अल्पेश यांच्या आईने व भावाने पुढील शिक्षणासाठी मदत केली. अल्पेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निघोजमध्येच झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. तीन वर्षांपासून दिल्ली येथे मित्रांसोबत राहून यूपीएससीची तयारी केली व अखेर यशाला गवसणी घातली.
ट्रक चालकाचा मुलगा अधिकारी
बापूसाहेब गायकवाड यांनी ५६१ वी रैंक मिळवली. ते चास (ता. नगर) येथील रहिवासी असून वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात. बापूसाहेब यांनी स्वतः देखील वॉचमन म्हणून काम केले आहे. आधी लहान भावाला शिकवून त्याला नोकरीला लावले व नंतर वेळ मिळेल तसा अभ्यास करून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे यूपीएससीचे स्वप्न साकार करण्यासाठी दिल्ली गाठली. अखेर परिस्थितीची जाण ठेवून चिकाटीने अभ्यास केला व ५६१ वी रँक मिळवली.
वडील एसटी आगारात
दृढ संकल्प आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अरणगाव (ता. जामखेड) येथील निखिल काशिबा तांबे यांनी अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी ५१७ वी रँक मिळवली. त्यांचे वडील काशिबा तांबे हे जामखेड एसटी आगारात हेल्पर म्हणून काम करतात. वडिलांच्या कष्टाने चीज करून निखिल यांनी हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
गावच्या शाळेतून दिल्लीपर्यंत यशस्वी प्रवास
वडील आणि चुलते शिक्षक असल्याने घरातूनच शिक्षणाचे बाळकडू मिळालेल्या ऋतुजा अशोक गायकवाड यांनी २५ व्या वर्षी यूपीएससीत यश मिळविले. त्यांनी देशात १०६ वी रँक मिळवली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) पदवी मिळविली आणि यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. गायकवाड कुटुंब हे मूळचे संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील रहिवासी. ऋतुजा यांचे वडील अशोक गायकवाड हे शिक्षक. त्यांचे मोठे बंधू बाजीराव हेही शिक्षक. त्यामुळे घरातूनच मार्गदर्शन होते. यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जायचे असे ऋतुजा यांनीच ठरवले होते. मर्यादित संसाधनांमध्ये यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान होते. त्यात त्यांनी यश मिळवले आहे.
जोर्वेला मिळणार आयपीएस अधिकारी
जोर्वे (ता. संगमनेर) गावातील प्रगतशील शेतकरी संजय रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव धनंजय दिघे यांनी यूपीएससी परीक्षेत ५२९ वी रँक मिळवून आयपीएस होण्याचा मान मिळवला आहे. धनंजय दिघे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन करत आपल्या कुटुंबाचा, जोर्वे गावाचा आणि संगमनेर तालुक्याचा लौकिक उंचावला आहे.

Post a Comment