अहिल्यानगर - शहरातील कायनेटिक चौक परिसरातील एका २३ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने केवळ तरुणीचा हात धरून तिला धमकावलेच नाही, तर तिच्या नियोजित सासरच्या मंडळींना फोन करून तिचे लग्नही मोडले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी गजराज हॉटेलसमोरून घरी जात असताना तुषार अर्जुन हरेल (रा. येलुलकर चाळ, रेल्वे स्टेशन) याने तिला अडवले. आरोपीने यापूर्वी तिला लग्नाची मागणी घातली होती, मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने सार्वजनिक ठिकाणी तरुणीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. "तू दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर याद राख," अशी धमकीही त्याने भररस्त्यात दिली.
इतक्यावरच न थांबता, आरोपीने तरुणीच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींना संपर्क साधला. "माझे आणि तिचे प्रेमसंबंध आहेत, तुम्ही मुलाचे लग्न तिच्याशी करू नका," असे खोटे सांगून त्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तुषार हरेल याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरंदले करत आहेत.

Post a Comment