नवी
दिल्ली: अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाचा भारताच्या
सूर्यफूल तेल आणि खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीला मोठा फटका बसण्याची
शक्यता आहे. पश्चिम आशिया आणि युरोपला होणाऱ्या कृषी मालाच्या निर्यातीवरही याचा
परिणाम होऊ शकतो, असा इशारा सोमवारी विविध उद्योग संघटनांनी दिला आहे.
भारत दर वर्षी सुमारे १६० लाख टन
खाद्यतेलाची आयात करतो. त्यामध्ये सूर्यफूल तेलाचा वाटा २० टक्के आहे. हे तेल
प्रामुख्याने रशिया, युक्रेन आणि अर्जेंटिनातून येते. खरीप हंगामासाठी आवश्यक
असणाऱ्या डीएपी आणि एसएसपी खतांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सल्फर आणि सल्फ्युरिक
ॲसिडच्या पुरवठ्याबाबत ‘सोल्यूबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन’चे अध्यक्ष राजीव
चक्रवर्ती यांनी चिंता व्यक्त केली. भारताच्या एकूण सल्फर आयातीपैकी ७६
टक्के हिस्सा कतार, यूएई आणि ओमान या देशांतून येतो. त्यामुळे खरीप हंगामात
शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
युद्धाचा
परिणाम आणखी कशावर?
युद्धामुळे ‘ब्रेंट
क्रूड’ ८.३४ टक्क्यांनी वधारून ७८.९५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, याचा थेट परिणाम
देशांतर्गत बाजारांच्या घसरणीवर झाला. याबाबत, जिओजित इन्व्हेस्टमेंट
लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, ‘पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजार अस्वस्थ
आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे घसरते मूल्य यामुळे भारतात
महागाई वाढण्याची शक्यता असून, कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.’
पश्चिम
आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि
गुंतवणूकदारांच्या हतबलतेमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराचे निर्देशांक
सेन्सेक्स आणि निफ्टीत एका टक्क्याहून अधिक घसरण नोंदवली गेली. जागतिक
बाजारपेठेतील नकारात्मक कल आणि परकीय निधीचा ओघ बाहेर गेल्याने गुंतवणूकदारांच्या
उत्साहावर विरजण पडले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक
सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात २,७४३.४६ अंकांनी (३.३७ टक्क्यांनी) घसरून ७८,५४३.७३ पर्यंत खाली आला
होता. मात्र, त्यानंतर सावरून दिवसअखेर तो १,०४८.३४ अंकांच्या (१.२९
टक्के) घसरणीसह ८०,२३८.८५ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी
व्यवहारादरम्यान ५७५.१५ अंकांनी (२.२८ टक्के) कोसळून २४,६०३.५० पर्यंत खाली आला
होता. बाजार बंद होताना तो ३१२.९५ अंकांच्या (१.२४ टक्के) घसरणीसह २४,८६५.७० वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजारात सेवा क्षेत्र ३.८१
टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू २.३० टक्के, वाहनांचे सुटे भाग २.२३
टक्के, तेल आणि नैसर्गिक वायू २.१५ टक्के आणि वीज क्षेत्रातील
समभाग २.०६ टक्क्यांनी घसरले. एकूण ३,५६१ शेअरमध्ये घसरण झाली, तर ८२१ शेअर वधारले. परकी
संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७,५३६.३६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली, तर देशांर्गत संस्थागत
गुंतवणूकदारांनी १२,२९२.८१ कोटी रुपयांची खरेदी केली.
हे ही वाचा ...
भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल...

Post a Comment