भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...



ह्युस्टन अमेरिकेतील टेक्सास राज्याची राजधानी असलेल्या ऑस्टिन शहरात रविवारी एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सविता शान (२१) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती टेक्सास विद्यापीठात शिकत होती.

ऑस्टिनच्या गजबजलेल्या परिसरात एका बारबाहेर बंदुकधारी माथेफिरूने गोळीबार केला. त्यात सवितासह चार जण ठार झाले. 'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अॅट ऑस्टिन'च्या प्रवक्त्याने शान ही त्यांची विद्यार्थिनी असल्याचे पुष्टी केली. सविता दुहेरी पदवीच्या वर्षाला शिकत होती. व्यवस्थापन माहिती पद्धती आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी ती एक गुणी विद्यार्थिनी होती, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अन्य दोघा मृतांचीही ओळख पटली आहे.

माथेफिरूचा गोळीबार दहशतवादी कृत्य असल्याचा संशय व्यक्त होत आहे. गोळीबारातील बळींपैकी एक म्हणून शानची ओळख पटल्यानंतर टेक्सासमधील भारतीय-अमेरिकन समुदायावर शोककळा पसरली आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून, त्याचं नाव एनडियागा डायग्नो (वय ५३) आहे. या हल्लेखोराचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृत्यांमध्ये सविता शान (२१), रायडर हॅरिंग्टन (१९), जॉर्ज पेडरसन (३०) यांचा समावेश आहे. या घटनेत १४ जण जखमी आहे. पोलिस व्हिडिओ फुटेजद्वारे घटनेचा तपास करत आहेत. तेथे उपस्थित असलेल्या १५० लोकांचीही चौकशी सुरु आहे.

कोण होती सविता शान?

सविता ही ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात ऑनर्सची विद्यार्थी होती. सविताने मॅककॉम्ब्स स्कूल ऑफ बिझनेसमधून शिक्षण घेतलं होतं. ती सध्या ऑनर्ससह डबल मेजर पदवी घेत होती. विद्यार्थी संघटनांमध्येही ती नेहमी सक्रिय असायची. सविताच्या प्राध्यपकांनी तिला आंदरांजली देत, ती एक सुपरस्टार विद्यार्थिनी होती असं म्हटलं. मे २०२६मध्ये ती पदवीधर होणार होती. तिला एका मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली होती. स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच ही घटना घडली.




0/Post a Comment/Comments