कुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा ने केले मुस्लिम बॉयफ्रेंड सोबत पळून जावून लग्न



मुंबई: 2025 च्या महाकुंभ मेळ्यात मोनालिसा नावाची रुद्राक्ष विकणारी मुलगी खूप चर्चेत आली. तिचे फोटो व्हायरल होऊ लागले. तिला सिनेमांच्या ऑफरही आल्या. पण आता तिने अचानक लग्न करुन सर्वांना धक्का दिला आहे. पण तिच्या या कृतीमुळे मोठा वादही निर्माण झाला आहे. मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी विवाह केला असून, या लग्नाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. मोनालिसाने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन फरमान खानशी लग्न केले आहे. यावेळी तिने आपल्या कुटुंबावर आरोप करत म्हटले की, तिचे कुटुंब तिच्यावर सतत दबाव टाकत होते, अगदी तिला धमक्या देण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होते. त्यामुळेच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

मोनालिसाने सर्वात आधी फरमान खान याच्याशी 'कोर्ट मॅरेज' केले आणि त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील अरुमानूर नैनार मंदिरात पारंपारिक हिंदू विवाह केला. मोनालिसाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा पती फरमान मोनालिसाच्या गळ्यात 'मंगळसूत्र' घालताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये हे जोडपे कोर्टाच्या आवारात उभे असून, त्यांच्या हातात विवाह प्रमाणपत्र असल्याचे दिसून येते.

मोनालिसा आणि फरमान खान दोघेही दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते; मात्र मोनालिसाच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला कोणताही पाठिंबा नव्हता. विशेषतः तिच्या वडिलांचा या रिलेशनला तीव्र विरोध होता. मोनालिसावर तिच्या कुटुंबाकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. मोनालिसाने सांगितले की, याच कारणामुळे तिने लग्न करण्यासाठी केरळ गाठले आणि तिने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. विवाह होण्यापूर्वी, बुधवार दिनांक 11 मार्च रोजी मोनालिसा आणि फरमान हे तिरुवनंतपुरम येथील थंपानूर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे, मोनालिसाने पोलिसांकडे सुरक्षतेची मागणी केली. कारण तिचे वडील तिला बळजबरीने पुन्हा घरी नेण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की मोनालिसा ही सज्ञान आहे आणि तिला स्वतःच्या मर्जीने लग्न करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मोनालिसाने सांगितले की, केरळमध्ये द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिची आणि फरमान खानची पहिली भेट झाली होती. फरमानने सांगितले की, सुरुवातीला मोनालिसानेच त्याला लग्नाची मागणी घातली होती, परंतु त्याने नकार दिला. पण नंतर तोही तिच्या प्रेमात पडला.

दिग्दर्शक मनोज मिश्रा यांना धक्का

मोनालिसाने अचानक लग्न केल्यामुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 'द मणिपूर डायरी' या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज मिश्रा हे देखील या घटनेमुळे हादरून गेले आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट लिहित दावा केला आहे की, मोनालिसा बळी ठरली आहे. मनोज यांनी पुढे असाही आरोप केला आहे की, मोनालिसाने लग्नासारखे हे पाऊल प्रेमापोटी उचलले नसून, तिची दिशाभूल करण्यात आल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. तसेच, तिच्या मॅनेजरने तिला दक्षिण भारतात अक्षरशः "विकून टाकले" आहे.

कोण आहे मोनालिसा?

मोनालिसाचे पूर्ण नाव मोनालिसा भोसले असे आहे. 2025 मध्ये महाकुंभ मेळ्यादरम्यान माळा विकताना ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथील मूळ रहिवासी असलेल्या मोनालिसाने, महाकुंभ मेळ्यादरम्यान तिच्या अत्यंत आकर्षक आणि सुंदर डोळ्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


 

0/Post a Comment/Comments