सिस पे नंतर ‘समर्थ क्रॉप केअर’च्या आमिषाला बळी; लाखोंची फसवणूक, ११ जणांवर गुन्हा दाखल



श्रीगोंदा - सुरवातीला सिस पे मध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करून फसवणूक झाल्यावर पुन्हा  ‘समर्थ क्रॉप केअर’ या कंपनीमार्फत एका तरुण शेतकऱ्याची तब्बल १२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विकास प्रशांत जाधव (वय 26, रा. श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एप्रिल–मे 2025 दरम्यान सोशल मीडियावर ‘समर्थ क्रॉप केअर’ची माहिती पाहून ते कंपनीच्या सेमिनारला उपस्थित राहिले. सेमिनारमध्ये “गुंतवणुकीवर दरमहा 10% परतावा (5% नफा + 5% मूळ)” असे आकर्षक आश्वासन देण्यात आले. पुण्यातील कार्यालयात भेटीदरम्यान कंपनीचे कामकाज, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि “मोठ्या परताव्याची हमी” यांचे सादरीकरण करून विश्वास संपादन करण्यात आला.

यानंतर तक्रारदाराने 19 मे 2025 रोजी 23 चेकद्वारे एकूण 18 लाख रुपये कंपनीच्या खात्यात जमा केल्याचे नमूद आहे. सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून जून–ऑगस्ट 2025 दरम्यान हप्त्यांमध्ये सुमारे 5.90 लाख रुपये परत करण्यात आले. मात्र पुढे परतावा अचानक बंद झाला. उर्वरित 12.10 लाख रुपये परत न करता टाळाटाळ करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, या प्रकरणात प्रशांत अनिल गवळी, ज्योती प्रशांत गवळी, अमृता प्रकाश सुपेकर, नवनाथ दगडू जाधव, सुदाम दास, प्रकाश मागणे, चंद्रकांत राकत, नागेश नामदेव जगताप, अविनाश सुरवसे, मनीषा सुदाम दास आदींसह इतरांनी संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप आहे.पोलीसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याच्या आमिषापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.यामध्ये सिस पे कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याने अनेक जण रस्त्यावर आले असताना पुन्हा एकदा समर्थक क्रॉप केअर कंपनीमध्ये कोट्यावधीची गुंतवणूक झाली असल्याने हजारो जणांनी फसवणुकीचे बळी ठरले आहे.


 

0/Post a Comment/Comments