कोर्टाचा दणका...गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला


अहिल्यानगर - गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी सुशीला दर्शन जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र आणि विशेष न्यायाधीश एम. एच. शेख यांनी फेटाळून लावला आहे. तोफखाना आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही प्रकरणांत फिर्यादींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभिजित पुप्पाल यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील एम. व्ही. दिवाने यांनी कामकाज पाहिले.

आरोपी सुशीला जगताप यांचा मुलगा राहुल (आरोपी क्र. ) आणि सून एंजल (आरोपी क्र. ) हे स्वतःला एका कंपनीचे मालक असल्याचे भासवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत असत. गुंतवणूकदारांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मिळालेली रक्कम आरोपी सुशीला जगताप यांच्या बँक खात्यात जमा केली जात होती फसवणूक उघडकीस आल्यावर सुशीला जगताप या 'ज्येष्ठ नागरिक आणि महिला' असल्याचा फायदा घेत अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या  मात्र, अशा प्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून यात सुशीला यांचा सकृतदर्शनी सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

24 लाख 70 हजार रुपयांच्या फसवणूक याप्रकरणी योगी महेंद्र सबलोक (वय ४७, रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या प्रकरणातील राजेश बन्सल या फिर्यादीने तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये सुशीला जगताप यांच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. यापैकी ३ कोटी ९० लाख रुपये त्यांना परत मिळाले. उर्वरित ८० लाख रुपये आणि कमिशनची रक्कम वारंवार मागणी करूनही आरोपींनी परत केली नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोन्ही प्रकरणांत सुशीला जगताप यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, फिर्यादींचे वकील ॲड. पुप्पाल यांनी न्यायालयात हस्तक्षेप करून जोरदार आक्षेप नोंदवला. हा केवळ दिवाणी स्वरूपाचा  व्यवहार नसून अशा फसवणुकीच्या अनेक घटना आहेत. उर्वरित रकमेची वसुली आणि सखोल तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले आणि १८ एप्रिल रोजी दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले.

हे ही वाचा ...

रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा: चित्रपटाचा ट्रेलर लाँच 

जगाची झोप उडाली! चीनचा ‘एंडलेस ड्रोन’ तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी

 


 

0/Post a Comment/Comments