अहिल्यानगर - ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात संस्थेचा संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (वय ३५, रा. टोकेवाडी ता. नगर) याच्याविरूध्द सुमारे दीड हजार पानी दोषारोपपत्र येथील विशेष एमपीआयडी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ठेवीदारांना गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (वय ४७, रा. शोभा कॉलनी, शिंदे मळा, सावेडी) यांनी यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पतसंस्थेच्या चेअरमनसह ७ जणांविरूध्द फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल कराळे, संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. अहिल्यानगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडे मळा, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे.
ठेवीदारांनी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेडमध्ये १४.४० टक्के व्याजदराने मुदतठेव ठेवली होती. काही दिवसांनी ठेवीदारांनी पतसंस्थेच्या चेअरमनकडे मुदतठेवीची मागणी केली. मात्र, सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, लोनचे पैसे जमा झाले की तुम्हाला बोलून घेवू व रक्कम परत देऊ असे सांगून वेळ मारून नेली होती. दरम्यान काही दिवसांनी पतसंस्था बंद झाली असल्याचे समोर आले. यामुळे ठेवीदारांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत १६ मे २०२४ रोजी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ हे करीत आहेत. तपासादरम्यान त्यांनी संचालक व सीईओ राहुल कराळे याला अटक केली होती. त्याच्याविरूध्द पुरावे जमा करून येथील विशेष एमपीआयडी न्यायालयात सुमारे दीड हजार पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित पसार संशयितांना अटक करून त्यांच्याविरूध्द पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फसवणुकीचा आकडा ७ कोटींच्या पुढे
नेवसे यांनी फिर्याद दिली त्यावेळी एकुण ११२ ठेवीदारांचे ५ कोटी ७८ लाख ६५ हजार ९० रूपये अडकले असल्याचे फिर्यादीत नमूद होते. पोलिसांनी तपासादरम्यान ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले असून एकुण १९६ ठेवीदारांनी जबाब दिले आहेत. फसवणूकीचा आकडा सुमारे ७ कोटींच्या पुढे गेला आहे. गुंतवणूकीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखविल्याने अनेकांचे पैसे अडकले आहेत.
हे ही वाचा...
रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा: चित्रपटाचा ट्रेलर लाँच
जगाची झोप उडाली! चीनचा ‘एंडलेस ड्रोन’ तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी

Post a Comment