ऐन पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीत राहुरीत गावठी कट्टा बाळगणारे दोघे पकडले


अहिल्यानगर - ऐन विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात राहुरी तालुक्यात गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्या कडून १ गावठी कट्टा, २ काडतुस आणि एक मारुती सुझुकी कंपनीची एक्स एल ६ कार असा एकुण ५ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील उंबरे येथे २० एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी नेमलेले पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक २० एप्रिल रोजी राहुरी तालुक्यामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी या पथकास इसम नामे विशाल पालवे व सोमनाथ मोरे (दोन्ही रा. नेवासा) हे गोटुंबे आखाडा ते शनिशिंगणापुर जाणारे रोडवर पांढऱ्या रंगाचे गाडीमध्ये विनापरवाना गावठी कट्टा कब्जात बाळगुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली.

पथक सदर वाहनाचा व इसमांचा शोध घेत असतांना सदरचे वाहन हे उंबरे ता. राहुरी, येथील हॉटेल माऊली परिसरामध्ये थांबलेले असल्याचे दिसुन आले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये दोन संशयीत इसम बसलेले दिसुन आले. पथकाने सदर इसमांना ताब्यात त्यांची नावे विचारली असता ते विशाल वसंत पालवे (वय २८, रा. झापवाडी रोड, घोडेगांव, ता. नेवासा) व सोमनाथ भानुदास मोरे (वय ३२, रा. शनिशिंगणापुर, ता. नेवासा) असे असल्याचे समोर आले. पोलिस पथकाने त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे १ गावठी कट्टा, २ काडतुसे आढळून आली. पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेत त्यांच्या विरुध्द राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

 हे ही वाचा ...

रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा: चित्रपटाचा ट्रेलर लाँच 

जगाची झोप उडाली! चीनचा ‘एंडलेस ड्रोन’ तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी  

उमेद अभियानामुळे महिलांना आर्थिक बळ, झाडू निर्मितीतून मिळवले स्वावलंबन 

 

 


0/Post a Comment/Comments