अहिल्यानगर - राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील राजकीय कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध आज, मंगळवारी (दि.२१) सायंकाळी ६ वा. पासून दि. २४ एप्रिलपर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत. त्यासाठी पथकांमार्फत तपासणी सुरू करण्यात येणार आहे
राहुरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २३) मतदान होणार आहे. निवडणुकीतील जाहीर प्रचाराची आज सांगता होणार आहे. मतदारसंघात मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण अबाधित राहावे यासाठी प्रचार संपल्यानंतर बाहेरील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मिरवणूक व प्रचार पथकातील सदस्य यांना तत्काळ मतदारसंघ सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक प्रशासनाकडून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कल्याण मंडप, मंगल कार्यालये व सामुदायिक सभागृहांची तपासणी करून बाहेरील व्यक्तींचा निवास आहे का याची पडताळणी केली जाईल. तसेच निवासगृह व अतिथिगृहांमधील राहणाऱ्यांची नोंद तपासली जाईल.
याशिवाय मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारून बाहेरील वाहनांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्रांची तपासणी करून ते मतदार आहेत की नाही याची खात्री केली जाईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याबरोबरच पोटनिवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २१ ते २३ एप्रिल या कालावधीत तसेच मतमोजणीच्या ४ मे रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस लागू करण्यात आला असून संबंधित क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे, असा आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकाऱ्यानी जारी केला आहे.
मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे २१ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी ४ मे रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघ व मतमोजणी केंद्र परिसरात कोरडा दिवस काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत सर्व अनुज्ञप्तीधारकांनी देशी व विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हे ही वाचा...
रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा: चित्रपटाचा ट्रेलर लाँच
जगाची झोप उडाली! चीनचा ‘एंडलेस ड्रोन’ तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी
उमेद अभियानामुळे महिलांना आर्थिक बळ, झाडू निर्मितीतून मिळवले स्वावलंबन

Post a Comment