मोठी कारवाई... भारताने राबवले 'ऑपरेशन रेजपिल'..! 'जिहादी ड्रग' चा कोट्यावधीचा साठा केला जप्त


 
नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार "ड्रग-मुक्त भारत" बनवण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध कडक धोरण राबविण्‍याबाबत कटिबद्ध आहे. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (NCB) 'ऑपरेशन रेजपिल' (Operation RAGEPILL) या मोठ्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत 'जिहादी ड्रग' म्हणून ओळखले जाणारे 'कॅप्टागॉन' जप्त केले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'X' पोस्‍टच्‍या मामध्‍यातून दिली. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्सची किंमत जवळपास १८२ कोटी रुपये असून, हा साठा मध्य पूर्व (Middle East) देशांच्या बाजारपेठेत पाठवला जाणार होता. 

अमित शहा यांनी आज (दि.१६) मोठ्या कारवाईबाबतची घोषणा करताना म्‍हटलं आहे की, नरेंद्र मोदी सरकार 'ड्रग-मुक्त भारत' घडवण्यासाठी संकल्पबद्ध आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, 'ऑपरेशन रेजपिल' द्वारे आमच्या यंत्रणांनी १८२ कोटी रुपयांचे 'कॅप्टागॉन' म्हणजेच तथाकथित 'जिहादी ड्रग' पहिल्यांदाच जप्त केले आहे. मध्य पूर्व देशांमध्ये जाणारा हा ड्रग्सचा साठा जप्त करणे आणि एका परदेशी नागरिकाला अटक करणे, हे अंमली पदार्थांविरुद्धच्या कठोर धोरणाचे वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे."
NCB च्या कामगिरीचे कौतुक करताना शहा यांनी म्‍हटलं की, "मी पुन्हा सांगतो, भारताच्या हद्दीत येणाऱ्या किंवा भारताचा वापर ट्रान्झिट रूट (मार्ग) म्हणून करून देशाबाहेर जाणाऱ्या ड्रग्सच्या प्रत्येक ग्रॅमवर आम्ही कडक कारवाई करू. NCB च्या शूर आणि सतर्क योद्ध्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."

कॅप्टागॉन (Captagon) म्हणजे काय?

कॅप्टागॉन हे 'फेनेथिलाइन'चे व्यावसायिक नाव आहे. हे एक कृत्रिम उत्तेजक आहे. ६० च्‍या दशकामध्‍ये 'अटेंशन डिसऑर्डर' (एकाग्रतेचा अभाव) आणि 'नार्कोलेप्सी' (अतिझोप येणे) यांसारख्या वैद्यकीय आजारांवर उपचारासाठी हे औषध लिहून दिले जात असे; परंतु, याच्या अतिव्यसनाधीनतेमुळे आणि गैरवापराच्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर बंदी घालण्यात आली होती.

मध्य पूर्वेतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरवापर

आज, काळ्या बाजारात विकल्या जाणाऱ्या बहुतेक बेकायदेशीर कॅप्टागॉन गोळ्यांची निमिर्ती छुप्‍या प्रयोगशाळांमध्ये होते. यामध्‍ये अ‍ॅम्फेटामाइन, मेथाम्फेटामाइन, कॅफिन आणि इतर कृत्रिम उत्तेजकांचे मिश्रण असते.मध्य पूर्वेतील अनेक भागांमध्ये याच्या उत्तेजक आणि तात्पुरता अत्यंत आनंद देणाऱ्या प्रभावांमुळे याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. हे ड्रग मानवी शरीरातील सतर्कता आणि ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी, भूक व थकवा कमी करण्यासाठी आणि तात्पुरती आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी ओळखले जाते. तथापि, यामुळे आक्रमकता, आवेगपूर्ण वर्तन, निर्णय क्षमता कमकुवत होणे आणि मानसिक परावलंबित्व (व्यसन) वाढू शकते.

याला 'जिहादी ड्रग' का म्हणतात?

जगभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटना आणि नेटवर्कशी ड्रगची तस्करी व वापर जोडला गेल्याचे अनेक आरोप आणि गुप्तचर अहवाल समोर आले आहेत, दहशतवादी याचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्‍याने त्‍याला "जिहादी ड्रग" असे संबोधले जाते. याचे उत्पादन मूल्य तुलनेने कमी आणि बेकायदेशीर मागणी प्रचंड असल्याने, कॅप्टागॉनला कधीकधी "गरिबांचे कोकेन" देखील म्हटले जाते. गेल्या दशकात, आंतरराष्ट्रीय तपास संस्थांनी केलेल्या चौकशीत आणि संघर्षग्रस्त भागातून जप्त केलेल्या साठ्यांमध्ये, सशस्त्र गट आणि तस्करी करणाऱ्या नेटवर्ककडे कॅप्टागॉनच्या गोळ्या सापडल्याचे उघड झाले होते.


 

0/Post a Comment/Comments