नगर - पुणे महामार्गावर भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू


सुपा - नगर पुणे महामार्गावरील पळवे शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना प्रविण ढाब्यासमोर घडली असून, या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू रामराव चौधरी (वय ३५, रा. माखणी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास पुणे ते नगर जाणाऱ्या महामार्गावर पळवे शिवारातील प्रविण ढाब्यासमोर विष्णू चौधरी हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विष्णू यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी मयताचा भाऊ योगीराज रामराव चौधरी (वय ३३, रा. माखणी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ जुलै रोजी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(), २८१, १२५(), १२५() सह मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४()() आणि १७७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुटे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments