मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलो वजनाचे २४ कॅरेट सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली असून, सोने तस्करीचे मोठे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी डीआरआयने भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आणि मुंबई विमानतळ कर्मचारी असलेला अजित आचरेकर याच्यासह सात जणांना अटक केली आहे.
६ जून २०२६ रोजी पहाटे विमानतळाजवळील ‘हॉटेल फेअरमॉँट’ परिसरात डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने विमानतळाबाहेर पोहोचवण्याचा कट होता, मात्र गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहात पकडले.
अटकेत असलेल्यांमध्ये तीन परदेशी प्रवासी, तीन विमानतळ कर्मचारी आणि एका स्थानिक स्वीकारकर्त्याचा समावेश आहे. बँकॉकहून मुंबईमार्गे प्रवास करणाऱ्या बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिकांनी २४ कॅरेट सोन्याची भुकटी मेणात लपवून भारतात आणली होती.
पुढील विमान प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. बांगलादेशी आणि श्रीलंकेच्या नागरिकांकडून तस्करीचे सोने स्वीकारून ते विमानतळाबाहेर पोहोचविण्यात काही विमान कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.
सध्या सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत हे सोने जप्त करण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची पुढील चौकशी सुरू आहे.

Post a Comment