अहिल्यानगर - संगमनेर तालुक्यात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका खाजगी इसमाला रंगेहात पकडले आहे. २२ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. नितीन किसन खर्डे (वय २९, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार हे जेसीबी मशीनच्या साहाय्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करतात. ८ जून रोजी आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदाराला तलाठी कार्यालय येथे बोलावून घेतले होते. तिथे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर कामाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना, खाजगी इसम नितीन खर्डे याने त्यांना गाठले. शेत जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरळीत चालवण्यासाठी आणि कोणतीही अडचण न येण्यासाठी त्याने मंडळ अधिकारी यांच्याकरिता ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. इतकेच नव्हे तर, ही लाचेची रक्कम न दिल्यास तक्रारदारावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची थेट धमकीही त्याने दिली.
या धमकीला न घाबरता तक्रारदाराने तातडीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. पथकाने १९ जून रोजी केलेल्या पडताळणीत नितीन खर्डे याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास संमती दिल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.त्यानंतर २२ जून रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या १० नोटांच्या स्वरूपात ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने खाजगी इसम नितीन खर्डे याला रंगेहात पकडले.
पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, पोलीस हवादार संदीप वनवे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment