अहिल्यानगर - शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकरी महिला आणि त्यांच्या पुतण्याला बेकायदेशीर टोळी जमा करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील शेंडी शिवारात घडली आहे. या मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या पुतण्याच्या खिशातील रोकड आणि शेतातील साहित्यासह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुशिला अरुण पुंड (वय ६१, रा. शेंडी, ता. नगर) यांनी २२ जून रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा पुतण्या हे १२ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेंडी गावातील शेत गट नंबर ३१२ मधील आपल्या शेतात गेल्या होत्या. यावेळी आरोपी दाऱ्या चव्हाण, नितीन सुंदर काळे, संजय दाऱ्या चव्हाण, दाऱ्या चव्हाण यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत इतर एक पुरुष व तीन महिला (सर्व रा. पोखर्डी, ता. नगर) अशा ९ ते १० जणांच्या बेकायदेशीर टोळीने शेतात प्रवेश केला.
"आमच्या शेतात बेकायदेशीररित्या का प्रवेश केला?" असे विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी सुशिला पुंड व त्यांचा पुतण्या अभिनव यांना लाथाबुक्क्यांनी व शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच अभिनव याच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी शेतातील शेततळ्याचा कागद आणि सोयाबीनचे ३० कट्टे (एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये) जबरदस्तीने वाहनात भरून पळवून नेले.
जाता जाता आरोपींनी, "तुमच्याकडे अजून ४ लाख २० हजार रुपये राहिले आहेत, ते दिल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही. तुम्ही जर पुन्हा या शेतात आले, तर तुमचे हातपाय बांधून मारून टाकू," अशी धमकी फिर्यादींना दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध बीएनएस कलम १११(१), १८९, ३२९, ३५२, ३५१(७), ११५(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment