नगर - पुणे महामार्गावर रात्री करायचे लुटमार, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या ५ जणांच्या मुसक्या

 


बेलवंडी - नगर - पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी शिवारात कार चालकाला अडवून बेदम मारहाण करत तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा बेलवंडी पोलिसांनी अवघ्या २ दिवसांत छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत ची माहिती अशी की, पनवेल येथील बबन मल्हारी औटी (वय ४५) हे आपल्या मूळ गावी नांदा (ता. आष्टी, जि. बीड) येथे जाऊन परतत असताना २१ जून रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गव्हाणवाडी शिवारातील स्वामी समर्थ हॉटेलसमोर लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी ६ ते ७ जणांच्या टोळीने त्यांना घेरले. "गाडी येथे का थांबवली?" असा जाब विचारत वाद घालत आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यानंतर आरोपींनी त्यांच्या इनोव्हा गाडीचा दरवाजा उघडून डॅशबोर्डमध्ये ठेवलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी औटी यांना त्यांच्या गाडीत बसवून शिरूरच्या दिशेने नेले व तेथे सोडून पळ काढला.जखमी अवस्थेत औटी यांनी ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधत मदतीची मागणी केली. माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरज अविदास ओहोळ, संकेत रमेश शेळके, शुभम दिलीप गायकवाड, क्षितिज दादासाहेब ओहोळ आणि मयूर तुळशीराम ओहोळ यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 

0/Post a Comment/Comments