पारनेर - सामाईक विहीर बुजवण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे ८ जून रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली असून, या हल्ल्यात एका महिलेचा पाय मोडला आहे, तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनेश धोंडीबा उंडे (वय ३७, रा. मांडओहळ फाटा, कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी उंडे यांच्या शेतात आरोपी हे जेसीबीच्या साहाय्याने सामाईक विहीर बुजवत होते. फिर्यादीने त्यांना ही विहीर सामाईक असल्याचे सांगून बुजवण्यास विरोध केला.
यावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी, त्यांचे भाऊ विजय, आई कमलाबाई वडील धोंडीबा आणि भावजय चैताली यांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने आणि दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादींच्या आईच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा पाय मोडला आहे.
तसेच फिर्यादीलाही दगड मारल्यामुळे त्यांच्या डाव्या कानाजवळ आणि उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. फिर्यादीचे भाऊ विजय उंडे यांनाही लोखंडी गजाने मारहाण करून जखमी करण्यात आले. मारहाण करून जखमी केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबाला "परत जर इकडे आलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
याप्रकरणी मल्हारी कुंडलिक उंडे, रामचंद्र कुंडलिक उंडे, सुरेखा मल्हारी उंडे (सर्व रा. मांडओहळ फाटा, कर्जुले हर्या) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४)) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोढवे हे करत आहेत.

Post a Comment