जिल्हा शासकीय रुग्णालयाची रेकॉर्ड रूम फोडून महत्वाच्या कागदपत्रांची चोरी


अहिल्यानगर - जिल्हा शासकीय रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाची असलेली 'एमएलसी' रेकॉर्ड रूम अज्ञात चोरट्याने फोडून  सन २०२१ ते २०२२ दरम्यानचे 'एमएलसी, ओपीडी, एक्स-रे विभागाचे बांधून ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्रांचे २४ गठ्ठे चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चोरी म्हणजे त्या काळात घडलेल्या एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा कायदेशीर पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक कैलास काशिनाथ शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फिर्यादी कैलास शिंदे हे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एमएलसी विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करतात. रुग्णालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स आणि सिटी स्कॅन रूमच्या जवळ असलेल्या खोली क्रमांक २८ मध्ये मागील १५ वर्षांचे न्यायालयीन व पोलीस केस संबंधित जुने रेकॉर्ड ठेवण्यात आलेले आहे. ५ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे रेकॉर्ड रूम व्यवस्थित कुलूप लावून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ९ जून रोजी सकाळी शिंदे हे जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी गेले असता, दरवाजाला आतून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी पाठीमागच्या बाजूला जाऊन पाहिले असता रेकॉर्ड रूमची खिडकी उघडी होती आणि तिचे लोखंडी ग्रील गायब होते. खिडकीतून आत प्रवेश केला असता, खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्याने खोलीतून सन २०२१ ते २०२२ दरम्यानचे 'एमएलसी, ओपीडी, एक्स-रे विभागाचे बांधून ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्रांचे २४ गठ्ठे आणि खिडकीचे लोखंडी ग्रील चोरून नेले असल्याचे समोर आले. ही बाब शिंदे यांनी तातडीने वरिष्ठांना कळविली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांना माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, पोलीस उपनिरीक्षक दिनकर यांच्या सह पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर शिंदे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०५ () नुसार गुन्हा दाखल केला आहे


 

0/Post a Comment/Comments